Lok Adalat Pudhari
नाशिक

National Lok Adalat Nashik | नाशिकमध्ये 9 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत! प्रलंबित खटले मिटवण्याची नागरिकांना मोठी संधी

National Lok Adalat Nashik | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व वाद मिटविण्यासाठी या लोकअदालतीत सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी केले आहे.

दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सुहास भोसले यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोकअदालतीत मोटार अपघात दावा प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, बँक व वित्तीय संस्थांची कर्जवसुली प्रकरणे, वीजचोरी व वीज देयकांबाबतची प्रकरणे, कौटुंबिक व वैवाहिक वाद (घटस्फोट वगळून), कामगार व वेतनविषयक वाद, भाडे, मालमत्ता व इतर दिवाणी स्वरूपाची प्रकरणे, फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणे, दाखलपूर्व वाद प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत.

लोकअदालतीच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, महावितरण, जिल्हा परिषद, विमा कंपनीचे पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व विविध शासकीय कार्यालये यांच्यासोबत योग्य प्रलंबित व दाखल पूर्व प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी बैठका घेण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय लोकअदालतीत प्रकरणे निकाली निघाल्यास तो निर्णय अंतिम असल्याने त्यावर अपील नाही. तसेच न्यायालयीन शुल्क भरल्यास ते संबंधित पक्षकारांना परत मिळते. तसेच प्रकरणे लोकअदालतीत मिटल्याने पक्षकारांचा पैसा, वेळ वाचतो.

जिल्ह्यातील वरील प्रकरणांशी संबंधित सर्व पक्षकार, वकीलवर्ग, वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी लोकअदालतीत सहभाग नोंदवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT