नाशिक : तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापासून एबी फॉर्मची पळवापळवी, बंडखोरी, पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात असताना अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर आलेली नामुष्की अशा अनेक घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही चांगलाच राडा पाहायला मिळाला.
मतदान यंत्र बिघाडामुळे मतदानातील व्यत्यय, मतदारयाद्यांतील गोंधळाचा मतदारांना झालेला त्रास, लक्ष्मीदर्शनाच्या तक्रारींतून सिडको व नाशिकरोडला उमेदवारांच्या घर - कार्यालयांवर हल्ला, दगडफेकीच्या घटना, जुन्या नाशिकमध्ये झालेली हाणामारी, उमेदवारांच्या वाहनांतून पैसे वाटपाच्या प्रकारामुळे नाशिकच्या निवडणुकीला काहीसे गालबोट लागले. महापालिकेसाठी 58 टक्के मतदान झाले आहे. 735 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान, शुक्रवारी (दि.16) मतमोजणीतून निकाल जाहीर केला जाणार आहे. नाशिकमध्ये पुन्हा कमळ फुलते की परिवर्तन घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक महापालिकेच्या 31 प्रभागांतील 122 जागांसाठी गुरुवारी (दि.15) सकाळी 7.30ला मतदानास सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीची (अजित पवार गट) युती, शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडी करत निवडणूक लढवल्याने शहरात बहुतांश प्रभागांत तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत दिसून आली.
विविध पक्षांचे 527 तर अपक्ष 208 असे 735 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची ठरली. मतदानाच्या दिवशी मकरसंक्रांतीची कर असल्याने मतदानासाठीचा भाव चार ते पाच हजारांपर्यंत पोहोचल्याने ‘लक्ष्मी’दर्शनाच्या प्रतीक्षेतील मतदार सकाळी मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे पहिल्या सहा तासांत जेमतेम 26.52 टक्के मतदान होऊ शकले. त्यानंतर उमेदवार आणि प्रतिनिधींनी हात जोडत विनवणी करत मतदारांना घराबाहेर काढल्याने दुपारनंतर गर्दी वाढली.
लक्ष्मीदर्शनाचीच चर्चा
मतदानासाठी 3 ते 4 हजारांचा भाव फुटल्याच्या चर्चेनंतर लक्ष्मीदर्शनाच्या प्रतीक्षेत अनेक भागात मतदार सकाळी घराबाहेर पडले नाही. त्यामुळे सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का रोडावला. नाशिकरोडला प्रभाग 17 मध्ये भाजप उमेदवार दिनकर आढाव पैसेवाटप करीत असल्याच्या तक्रारीनंतर पोलिस कारवाईत दोन लाखांच्या रोकडसह आढाव यांची चारचाकी जप्त करण्यात आली. देवळालीत पैसे वाटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास कार्यकर्त्यांनी चोप दिला. आडगावला मतदान यंत्रात 3 बटण दाबले जात होते. मात्र, 1 बटण दाबले जात नसल्याच्या तक्रारीनंतर नवीन मतदान यंत्र लावले. तोपर्यंत मतदान थांबले होते.
सिडकोत पोलिसांचा लाठीमार
सिडकोत मतदानाच्या दिवशी अधिकच गोंधळ दिसून आला. भाजपचे बहुचर्चित उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या सावतानगर कार्यालयाच्या पाठीमागील उद्यानात पैसेवाटप होत असल्याच्या तक्रारी झाल्या. भाजपचे प्रभाग 29 मधील बंडखोर मुकेश शहाणे यांनी सावतानगर येथे धाव घेत हुज्जत घातली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जुन्या नाशिकमध्ये प्रभाग 14 मधील नागसेननगर भागात राशप उमेदवार संजय चव्हाण यांना मारहाणीची घटना घडली.
भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
नाशिकरोड भागात पैसेवाटप झाल्याच्या तक्रारी झाल्या. भाजपच्या एका उमेदवाराची मुलगी मतदारांना पैसे वाटत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. नाशिकरोड प्रभाग क्रमांक 21 मध्ये तोफखाना केंद्र रस्त्यावरील खोले मळा येथे भाजप उमेदवार नितीन ऊर्फ टिंकू खोले यांच्या घरावर शिंदे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी दगडफेक करत संरक्षक दरवाजाची तोडफोड केली. यावेळी शिंदे गट व भाजप कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली होती.
बटण धनुष्यबाणाचे लाइट लागतोय कमळाचा
प्रभाग 24 मध्ये गोविंदनगर भागात ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर शिंदे गटाच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबल्यानंतर ईव्हीएममध्ये भाजपच्या उमेदवारासमोरील लाईट लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावलं जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र मतदान यंत्र सुस्थितीत असून, तक्रारीत तथ्य नसल्याचा दावा केला. प्रभाग 24 मधील मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडल्याने सकाळी अर्धा तास मतदान खोळंबल्याची घटना घडली.
मतदारयाद्यांतील गोंधळाचा फटका
विधानसभा निवडणुकीत प्रकर्षाने जाणवलेला मतदारयाद्यांमधील गोंधळ महापालिका निवडणुकीतही कायम राहिल्याचे चित्र मतदानाच्या दिवशी स्पष्ट झाले. अनेक प्रभागांमध्ये मतदारांची नावे अचानक दुसऱ्याच मतदान केंद्रावर आल्याने मतदारांना मोठा त्रास सोसावा लागला. त्यामुळे अनेक मतदारांनी मतदान न करताच घरी परतणे पसंत केल्याने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेल्या मतदारांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदारयादीत आपले नाव नसल्याचे समजताच अनेक मतदार गोंधळून गेले.
असे झाले मतदान
7.30 ते 9.30 - 6.51%
9.30 ते 11.30 -16.07 %
11.30 ते 1.30 -26.51%
1.30 ते 3.30 - 39.64%
3.30 ते 5.30 - 58%
आतापर्यंतचे
2007 - 60%
2012- 57.18%
2017 - 61.60%
2026- 58%
58 टक्के मतदान; 735 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
सिडकोत लक्ष्मीदर्शनाच्या चर्चेने गोंधळ, प्रभाग 25 मध्ये पोलिसांचा लाठीमार
नाशिकरोडला प्रभाग 21 मध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
प्रभाग 14 मध्ये नागसेनवाडीत राशप उमेदवाराला मारहाण
मतदान यंत्रात बिघाडामुळे अनेक ठिकाणी मतदान विस्कळीत
धनुष्यबाणाचे बटण दाबल्यावर कमळसमोरील लाइट लागत असल्याची तक्रार
प्रभाग 17 मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत पैसे, वाहन जप्त
देवळालीत पैसे वाटणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास चोप
ईव्हीएमवरील उमेदवारांचा अनुक्रम बदलल्याने गोंधळ
हाणामारीनंतर पोलिस आयुक्तांकडून संवेदनशील केंद्रांची पाहणी