

सिन्नर : मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जीवितास व पर्यावरणास धोका निर्माण होत असल्याने सिन्नर नगर परिषद व सिन्नर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत विविध भागांतून जवळपास १०० हून अधिक नायलॉन मांजाचे आसारी जप्त करून नष्ट करण्यात आले, तर नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर कायमस्वरूपी बंदी असतानाही काही ठिकाणी त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस निरीक्षक हेमंतकुमाार भामरे व सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठित करण्यात आले होते.
सिन्नर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर (खर्जेमाळा), काजीपुरा, लोंढे गल्ली, तानाजी चौक व आसपासच्या परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान सिन्नर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी नायलॉन मांजाचे आसारी गोळा करून नगरपालिकेच्या आवारात नेऊन नष्ट केले. तसेच नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्या इसमांविरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण मोहीम नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अंकुश वारुंगसे, दादासाहेब गाढवे, संजय गोसावी, हवालदार समाधान बोराडे, गणेश वराडे, नितीन डावखर, नवनाथ पवार, पोलिस नाईक विलास बिडगर, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे, साईनाथ नागरे तसेच नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
यापुढे कारवाई सुरू राहणार
नायलॉन मांजामुळे नागरिक, पशुपक्षी व पर्यावरणास गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारची संयुक्त कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा सिन्नर पोलिस व नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.