1. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपमधील एबी फॉर्म वाटपावरून मोठा गोंधळ
2. मुकेश शहाणेंसह भाजपच्या चार उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध
3. दीपक बडगुजर यांचे प्रभाग २५ व २९ मधील अर्ज वैध ठरले
4. सिडको विभागीय कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त; तणावाचे वातावरण
5. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप; भाजपातील अंतर्गत वाद उफाळला
सिडको | पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश आणि एबी फॉर्म वाटपावरून सुरू झालेल्या राजकीय महानाट्याचा तिसरा अंक बुधवारी (दि. ३१) सिडको विभागात रंगला. एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या गोंधळाच्या सलग दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान माजी नगरसेवक मुकेश शहाणे, भाग्यश्री ढोमसे यांच्यासह भाजपच्या एकूण चार उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध ठरविण्यात आले.
दुसरीकडे, शहाणे यांचे पारंपरिक राजकीय वैरी मानले जाणारे सुधाकर बडगुजर, त्यांची पत्नी हर्षा बडगुजर आणि चिरंजीव दीपक बडगुजर यांचे प्रभाग क्रमांक २५ मधील एबी फॉर्म वैध ठरविण्यात आले. तसेच दीपक बडगुजर यांचा प्रभाग क्रमांक २९ मधील अर्जही वैध ठरल्याने मुकेश शहाणे यांनी आपल्या अर्जाच्या बाद होण्यास सुधाकर बडगुजर जबाबदार असल्याचा आरोप केला. यामुळे दोन्ही गट आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी भाजपमध्ये मोठा गोंधळ झाला होता. एबी फॉर्म वाटपावरून झालेल्या या राड्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. बुधवारी अर्ज छाननीदरम्यान प्रभाग क्रमांक २९ साठी सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे या दोघांनाही भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचे समोर आले, त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.
सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा व वाद सुरू राहिल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दीपक बडगुजर यांचा एबी फॉर्म वैध, तर मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरविला. दीपक बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज आधी दाखल केल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले.
संभाव्य तणाव लक्षात घेता सिडको विभागीय कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. अंबड, एमआयडीसी, सातपूर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यांतील पोलिसांना पाचारण करण्यात आले. परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. निर्णयानंतर पोलिसांनी मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर यांना वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून कार्यालयाबाहेर काढले. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे अनर्थ टळला, मात्र रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.
नाराज झालेल्या संगीता पाटील यांचे पती रवि पाटील यांनी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना सिडको विभागीय कार्यालयाबाहेर थेट जाब विचारला. यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली. “हा खानदेशी माणसांवर अन्याय असून खानदेशी मतदार हे सहन करणार नाहीत,” असा आरोप रवि पाटील यांनी केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयाराम-गयारामांना उमेदवारी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. त्यामुळे भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भाजपच्या माजी नगरसेविका अलका अहिरे आणि पुष्पावती पवार या दोघींनाही एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमांनुसार अलका अहिरे यांचा एबी फॉर्म वैध, तर पुष्पावती पवार यांचा एबी फॉर्म अवैध ठरविला.
निवडणूक नियमांनुसार एका प्रभागात दोन एबी फॉर्म दिले गेल्यास, ज्याचा उमेदवारी अर्ज आधी दाखल झाला असेल त्याचा फॉर्म ग्राह्य धरला जातो. या निकषांनुसारच सर्व निर्णय देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.