

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक नन्नावरे यांच्या पत्नी भाजप उमेदवार रूपाली नन्नावरे यांच्या अर्जावर उमेदवारांनी हरकत नोंदविली. या नोंदविलेल्या हरकतीं विरोधात सर्व विरोधक एकटवले होते. त्यांच्याकडून बराच वेळ गोंधळ सुरू होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवला.
पंचवटी विभागात छाननीत सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने ३९२ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग क्रमांक एकमधील अनुसूचित जाती महिला राखीव या जागेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या रूपाली नन्नावरे यांच्या अर्जात आडनावात ननावरे असा उल्लेख करण्यात आला असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावा, असा तक्रार अर्ज शोभा साळवे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला.
निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे यांनी सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व आयोगाच्या नियमानुसार छाननी केली आहे. तसेच किरकोळ चुकीसाठी अर्ज बाद करू नये, असा निर्णय देत त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रमांक एकमधील ड गटात बाळकृष्ण धुमाळ यांचा अर्ज शपथपत्र साक्षांकित केलेले नसल्याने अर्ज अवैध ठरला.
प्रभाग क्रमांक दोन २ क मधील अमोल सूर्यवंशी यांनी शपथपत्र नोटरी केले नसल्याने, दोनमधील कैलास शिंदे यांचा अनुमोदक एकच त्यामुळे एक अर्ज अवैध ठरला. प्रभाग तीन ड मधील संजय संघवी यांच्या अर्जात शपथपत्र नमुने कोरे असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.
प्रभाग तीन ड मधील संदीप आवारे, शपथपत्र नमुने कोरे ठेवण्याने अर्ज अवैध तसेच प्रभाग क्रमांक ४ क मधील नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग या गटात वंदना सोनवणे यांनी अनुसूचित जातीचा दाखला दाखल केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला.