नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत स्थायी समितीचा मोठा उद्रेक; 650 कोटींची वाढीव कामे कागदावरच!

Nashik Municipal Corporation | 'स्थायीचे अस्तित्व काय?' संतप्त सदस्यांचा सभापती, आयुक्तांना प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात स्थायी समिती आणि महासभेने तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांची वाढ केली. मात्र, वाढीव निधीतून सदस्यांच्या किरकोळ कामांच्या लाख-दोन लाखांच्या फायलीही मंजूर होत नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांचा संताप अनावर झाला.

स्थायी समितीने केलेली वाढ केवळ कागदावरच असून, प्रत्यक्षात प्रशासनाच्याच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. 'सदस्यांच्या कामांची एक लाखाची फाइलही मंजूर होत नसेल, तर वाढीव अंदाजपत्रक छापून त्यावर खर्च कशासाठी केला? स्थायी समितीचे अस्तित्व तरी काय?' असा प्रश्न सदस्यांनी सभापती मच्छिंद्र सानप यांना केला.

सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. १०) स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत अंदाजपत्रकाच्या अंमलबजावणीवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी सन २०२६-२७ साठी ३,०११.८५ कोटी रुपयांचे प्रारूप अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने तब्बल ४५७.२८ कोटी रुपयांची वाढ सुचवून ३,४६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले.

महासभेने त्यात आणखी जवळपास १९८ कोटी रुपयांची भर घालत अंदाजपत्रकाचा आकडा सुमारे ३,६६६ कोटी रुपयांवर नेला. अशा प्रकारे सदस्यांच्या विकासकामांसाठी स्थायी समिती आणि महासभेने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली असतानाही प्रत्यक्षात सदस्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळत नसल्याची तक्रार भारती ताजनपुरे यांनी केली.

'किरकोळ कामांच्या फायलीही मंजूर होत नसतील, तर वाढीव अंदाजपत्रकाची छपाई करून महापालिकेच्या पैशाचा खर्च कशासाठी केला?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. योगेश गाडेकर यांनीही प्रशासनावर निशाणा साधत, 'अंदाजपत्रक कागदावरच आहे. सदस्यांच्या पत्रांना आणि प्रस्तावांना कोणतीही किंमत उरलेली नाही,' असा आरोप केला. स्थायी समितीचे कामकाज चेष्टेचा विषय झाले असून, स्थायी समिती अस्तित्वात आहे का, असा प्रश्नही त्यांनी सभापतींना केला.

निधीशिवाय कामे अशक्य : आयुक्त डॉ. खत्री

सदस्यांच्या आरोपांवर आयुक्त डॉ. मनीषा खत्री यांनी, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय वाढीव अंदाजपत्रकातील कामांची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. निधीअभावी सदस्यांच्या कामांना मंजुरी देता येत नसल्याचे सांगत, शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयुक्त - सदस्यांमध्ये खडाजंगी

ताजनपुरे यांनी अंदाजपत्रकाच्या छपाईसाठी किती खर्च झाला, याची माहिती लेखाधिकाऱ्यांकडून मागितली. आयुक्त खत्री यांनी याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, ताजनपुरे आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. 'तुम्ही अधिकाऱ्यांना बोलू देत नाहीत, तर अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवताच कशाला?' असे खडेबोल आयुक्तांनी सुनावले.

पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू

सदस्यांचा वाढता आक्रमक पवित्रा पाहता, सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. स्थायी समिती सदस्यांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली असून, वाढीव निधी आणि कामांसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून निधी प्राप्त होताच, सर्व सदस्यांची कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन सानप यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT