

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालक व अधिकाऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बँकेतील कथित गैरव्यवहार आणि आर्थिक नुकसानीप्रकरणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ अन्वये माजी संचालकांची व संबंधितांची पुन्हा फेरचौकशी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांनी दिले आहेत.
या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांची प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०१४-१५ च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालातील त्रुटींच्या आधारे बँकेच्या २० मोठ्या थकीत व एनपीए कर्ज प्रकरणांची चाचणी लेखापरीक्षा करण्यात आली होती.
त्यानंतर संगमनेरचे तत्कालीन उपनिबंधक जयेश आहेर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. चौकशी अहवालात बँकेने 'युनिट एक्स्पोजर नॉर्म्स'चे उल्लंघन करणे, पुरेसे तारण न घेता व एनपीए खात्यांना नवीन कर्जे मंजूर करणे, तसेच नियम ३५ चे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर निधी अडकवून ठेवल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते.
यानंतर कलम ८८ अन्वये करण्यात आलेल्या चौकशीत तत्कालीन प्राधिकृत चौकशी अधिकारी गौतम बलसाणे यांनी बँकेच्या एकूण ४४ माजी संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांवर १८२.०३ कोटींच्या आर्थिक नुकसानीची वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली होती.
या प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्यांच्या ३१ डिसेंबर २०२१ च्या आदेशाविरोधात राजेंद्र सदाशिव डोखळे व इतरांनी सहकारमंत्री यांच्याकडे कलम १५२ अन्वये अपील दाखल केले होते. सदर अपिलावर सहकारमंत्र्यांनी पूर्वीचा रद्दबातल आदेश रद्द केला व प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे निर्देश १२ ऑगस्ट २०२६ रोजी दिले.
त्यावर, विभागीय सहनिबंधक निकम यांनी जिल्हा उपनिबंधक भोळे हे प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करत, चौकशी पूर्ण करून विहित मुदतीत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.
या फेरचौकशीत प्रामुख्याने १२ संस्थांशी संबंधित सुमारे ३४७.६१ कोटींच्या आर्थिक नुकसानीबाबत चौकशी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने निफाड सहकारी साखर कारखाना लि. (१४७.४८ कोटी), नाशिक सहकारी साखर कारखाना लि. (१३६.९२ कोटी),
श्रीराम सहकारी बँक लि. (२५.८२ कोटी), आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (१९.८५ कोटी), रेणुकादेवी यंत्रमाग औ.स.सं. मालेगाव (१३.६९ कोटी), यासह सिन्नर, म्हेळुसके, येसगाव, दहिंवी, वारे, मावडी व वणी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या कर्ज प्रकरणांचा समावेश आहे.