Nashik Recruitment News  
नाशिक

Nashik Recruitment News |महापालिकेतील 300 जागांसाठी 19,400 अर्ज

Nashik Recruitment News | नाशिक सार्वत्रिक निकालानंतर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिक्तपदांच्या नोकरभरती प्रक्रियेला वेग आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक सार्वत्रिक निकालानंतर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिक्तपदांच्या नोकरभरती प्रक्रियेला वेग आला आहे. तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या ११४ तर अग्निशमन विभागातील वाहनचालक व फायरमनच्या १८६ अशा एकूण ३०० पदांच्या भरतीसाठी तब्बल १९ हजार ४०० जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या नोकरभरतीसाठी 'टीसीएस' मार्फत येत्या २४ व २५ फेब्रुवारीला लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे.

नाशिक महापालिकेत गेल्या २४ वर्षांत नोकरभरती झालेली नाही. नाशिक महापालिकेचा समावेश 'ब' वर्गात होऊन आता १० वषपेिक्षा अधिक कालावधी उलटला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र 'क' वर्गीय महापालिकेचाच आहे.

सद्यस्थितीत नाशिक मनपामध्ये एकूण 'अ' ते 'ड' संवर्गाची ७,७२५ पदे मंजूर आहेत. लोकसंख्येनुसार 'ब'वर्गीय महापालिकेची मनुष्यबळाची गरज लक्षात घेता २०१७ मध्ये महापालिकेचा १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनास सादर केला होता.

त्या नंतर १६ मार्च २०२३ रोजी शासनाने महापालिकेला पत्र पाठवत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने सर्व विभागांचा आढावा घेऊन ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेने शासनास सादर केला; परंतु या आकृतिबंधास अद्यापही मान्यता मिळू शकलेली नाही.

सद्यस्थितीत ७,७२५ पदांपैकी सुमारे चार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास ३,८०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी नोकरभरती करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन मंजुरीने पहिल्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील ११४ तर अग्निशमन विभागातील १८६ पदांच्या भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी विहीत मुदतीत १९,४०० अर्ज प्राप्त झाले आहेत. तांत्रिक संवर्गातील पदांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

आठ दिवस अगोदर प्रवेशपत्र

या नोकरभरतीसाठी राज्यभरातील १० ते ११ शहरांमधील केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी महापालिका व टीसीएसमार्फत २४ व २५ फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना आठ दिवस अगोदर प्रवेशपत्र ऑनलाइन लॉगीन आयडीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली टीसीएसमार्फत पारदर्शक पद्धतीने नोकरभरती प्रक्रिया राबविली जात आहे. लेखी परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आली असून, अर्जदारांना परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जातील.
- लक्ष्मीकांत साताळकर, उपआयुक्त (प्रशासन), महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT