नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | खासगी रुग्णालयांची महापालिकेकडून धडक तपासणी

Nashik Municipal Corporation | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात होणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई नाक्यावरील मालती आयव्हीएफ सेंटरचे बदलापुरातील स्त्री बीज प्रकरणानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्व ६७४ खासगी रुग्णालये, दवाखान्यांची तसेच सोनोगाफी, गर्भपात केंद्रे, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर्सची धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवडाभरात २७ खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली असून, त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

मुंबई शुश्रूषागृह अधिनियम १९४९ सुधारित नियम २००६ नुसार महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेले प्रत्येक रुग्णालय, नर्सिंग होम, शुश्रूषागृह यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करणे व दर तीन वर्षांनी नूतनीकरण करून घेणे क्रमप्राप्त आहे.

मात्र अनेक रुग्णालयांची नोंदणी नसल्याचे तसेच परवाना नूतनीकरण केले नसल्याचे समोर येत आहे. त्यातच महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीत आढळून आलेले अवैध गर्भपात केंद्र आणि काही महिन्यांपूर्वी मुंबई नाक्यावरील मालती आयव्हीएफ सेंटरविरोधात बदलापुरात स्त्रीबीज तस्करी प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी महापालिकेने दिलेला नोंदणी परवाना चर्चेचा विषय बनला होता.

त्यातच रुग्णालयाच्या दर्शनीय भागामध्ये रुग्ण हक्क सनद व उपचार दरपत्रक याची माहिती लावली जात नसल्याच्या तक्रारीही होत्या. त्यामुळे शहरातील सर्वच रुग्णालयांची वर्षातून दोनदा अर्थात सहामाही तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. शहरातील सर्वच ६७४ रुग्णालये व दवाखान्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून, त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत.

"शहरातील सर्व रुग्णालये, प्रसूतिगृहे, गर्भपात केंद्रे, सोनोगाफी केंद्रांची नाशिक महापालिकेच्या ३० शहरी आरोग्यसेवा केंद्रांच्या वैद्यकीय पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येत आहेत."
– डॉ. प्रशांत शेटे, प्र. मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, महापालिका

शहरी आरोग्यसेवा केंद्रांची ३० पथके

महापालिकेच्या माध्यमातून शहरात ३० शहरी आरोग्यसेवा केंद्रे चालविली जातात. खासगी रुग्णालयाच्या तपासणीची जबाबदारी या शहरी आरोग्यसेवा केंद्रांवर सोपविण्यात आली आहे. शहरी आरोग्यसेवा केंद्रांची पथके रुग्णालयांची तपासणी करत आहे.

या कागदपत्रांची केली तपासणी

  • महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील नोंदणी परवाना

  • एमआयटीपी अ‍ॅक्ट अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • नगररचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र

  • जैविक घनकचरा विल्हेवाट प्रमाणपत्र, ना हरकत दाखला

  • अग्निशामक ना हरकत दाखला सोबत फायर ऑडिट

  • महापालिकेचा घरपट्टी, पाणीपट्टी भरल्याचा दाखला

  • प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा ना हरकत दाखला

  • इलेक्ट्रिकल ऑडिट, रुग्ण हक्क सनद, उपचार दरपत्रक

  • रुग्णालयातील डॉक्टर, सिस्टर व बेडची संख्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT