नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि डेंग्यू, स्वाइन फ्लू सह साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक मनपाकडून पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी तीन वर्षांत ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी आरोग्य विभागाकडून येत्या १५ दिवसांत निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अडचणीच्या भागात ड्रोनच्या माध्यमातून धूरफवारणी करण्याची अट निविदेत समाविष्ट करण्यात आल्याने या नव्या तरतुदीला ठेकेदाराकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेकडून पेस्ट कंट्रोलचे काम ठेकेदारांमार्फत केले जाते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरात डासांचा प्रादुर्भाव कायम असून, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूंसारख्या आजारांचे रुग्ण आढळत आहेत. धूरफवारणीचा डासांवर अपेक्षित परिणाम होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.
ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, मनपाच्या निधीचा योग्य विनियोग होत नसल्याची टीकाही करण्यात आली होती. धूरफवारणीचे काम ठेकेदारांऐवजी महापालिकेने स्वतः करावे, अशी मागणी महासभेत करण्यात आली होती.
मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे प्रशासनाला ठेकेदारांमार्फतच हे काम करून घ्यावे लागत आहे. कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखली जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडूनही होत आहेत. त्यामुळे नव्या निविदा प्रक्रियेत कामाच्या दर्जावर आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीवर प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.
असा होणार खर्च
नवीन निविदांनुसार नाशिकरोड, पंचवटी आणि नाशिक पूर्व विभागांसाठी २३ कोटी रुपये, तर नाशिक पश्चिम, सातपूर आणि नवीन नाशिक विभागांसाठी १७ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तीन वर्षांच्या या कंत्राटातून डास नियंत्रणाचे काम अधिक प्रभावी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ड्रोनद्वारे फवारणीची अट आणि कामाच्या गुणवत्तेवर ठेवण्यात येणारे नियंत्रण यामुळे नव्या कंत्राट प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.