Nashik Kumbh Mela 2026 
नाशिक

Nashik Kumbh Mela 2026 | नाशिककरांना खड्ड्यांतून मिळणार कायमची मुक्ती! 1400 कोटींच्या रस्ते विकासाचा 'प्लॅन' जाहीर

Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थासाठी नाशिकचा कायापालट; 28 रस्ते अन् 4 पुलांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. शहरातील एकूण २८ रस्ते आणि चार पुलांची सुमारे १४०० कोटी रुपयांची विकासकामे सध्या सुरू असून, ही सर्व कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली आहे.

ग्रीन बॉण्डच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त खत्री यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत स्पष्टीकरण दिले. सिंहस्थपूर्व तयारीच्या अनुषंगाने रस्ते एकदाच बांधून पुन्हा खोदकाम टाळण्यासाठी महापालिकेकडून युटिलिटी डक्ट प्रणाली राबवली जात आहे. यामध्ये स्वयंपाकाचा गॅस पाइपलाईन, विद्युत तारा भूमिगत करणे, पाणीपुरवठा वाहिन्या, मलनिस्सारण व्यवस्था, ऑप्टिकल फायबर केबल्स आदी सर्व सुविधा एकाच उपयोगिता नाल्यातून (युटिलिटी डक्ट) नेल्या जाणार आहेत.

ठरलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार १५ मार्चपर्यंत अस्तित्वातील रस्ते खोदून युटिलिटी डक्टची कामे पूर्ण केली जातील. त्यानंतर १५ एप्रिलपर्यंत रस्त्यांचा बेस (WBM – वॉटर बाउंड मॅकॅडम) टप्पा पूर्ण केला जाणार आहे. पावसाळ्यात बांधकाम शक्य नसल्याने हा कालावधी बेस मजबूत होण्यासाठी दिला जाणार असून, ऑक्टोबरपासून व्हाईट टॉपिंग (काँक्रीट रस्ते) करण्यास सुरुवात होईल. संपूर्ण प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.

या कामांमुळे नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार असला तरी, सिंहस्थसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी दीर्घकालीन, मजबूत आणि दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिककरांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त खत्री यांनी केले आहे.

कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी महापालिकेने मक्तेदारांना कठोर सूचना दिल्या आहेत. महापालिकेचे अधिकारी नियमित पाहणी करणार असून, त्रयस्थ संस्थेमार्फत स्वतंत्र गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संबंधित मक्तेदारांना देयक अदा केले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, शहरात घरगुती गॅस पाइपलाईनसाठी एमएनजीएलकडून सुरू असलेल्या खोदकामाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ज्या रस्त्यांना परवानगी देण्यात आली आहे, त्याठिकाणीच पाइपलाईनची कामे पूर्ण करावी लागतील. त्यानंतर पुढील दोन वर्षे एमएनजीएलला कोणतेही रस्ते खोदण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहराला आधुनिक, सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात असून, ही कामे भविष्यातील अनेक दशकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT