सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे 32 रुग्ण; महापालिका आरोग्य विभागाची माहिती  pudhari photo
नाशिक

Dengue Cases | नाशिकमध्ये मान्सूनपूर्व काळातच डेंग्यूचे सावट! मेअखेरपर्यंत 14 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर

Dengue Cases | पावसाळ्यापूर्वीच आढळले 14 रुग्ण; मनपाने हाती घेतली प्रतिबंधात्मक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मान्सूनपूर्व काळातच शहरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, मेअखेरपर्यंत १४ रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नाशिक महापालिकेने शहरभर विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली असून, नागरिकांनाही स्वच्छता आणि खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये मेअखेरपर्यंत ८६० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १४ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे अद्याप मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या वर्षी ४ हजार ६३७ तपासण्यांमध्ये ६१२ डेंग्यू रुग्ण आढळले होते, तर २०२४ मध्ये १ हजार १७२ रुग्णांची नोंद झाली होती.

मलेरियाबाबतही प्रशासन सतर्क झाले असून, यंदा मेअखेरपर्यंत ४९ हजार १४१ तपासण्यांत ६ रुग्ण आढळले आहेत. मागील दोन वर्षांत मलेरियाचे अनुक्रमे १९ आणि २९ रुग्ण आढळले होते. डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत शहरात अळीनाशक फवारणी, धूरळणी आणि डास प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत.

बांधकामस्थळे, बेसमेंट, गच्च्या, सोसायट्या, कूलर, फ्रीज पॅन, पाण्याच्या टाक्या आणि साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची नियमित तपासणी केली जात आहे. कायम व तात्पुरत्या डास उत्पत्ती स्थळांवर आठवड्याला अळीनाशक फवारणी केली जात आहे. टायर दुकाने, भंगार दुकाने आणि झोपडपट्टी भागांमध्ये विशेष मोहिमा राबवून आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

नदी नाले, डबकी, विहिरी आणि कारंज्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरू असून, आवश्यक ठिकाणी अॅबेट ट्रीटमेंटही केली जात आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी हस्तपत्रके, लाउडस्पीकरद्वारे सूचना आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येत आहे.

आठवड्यातून एक दिवस ड्राय डे

महापालिकेने नागरिकांना घराभोवती स्वच्छता राखणे, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे आणि मच्छरदाणी किंवा मच्छरप्रतिबंधक क्रीमचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी किंवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.

मान्सूनपूर्व स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र डेंग्यू आणि मलेरियावर प्रभावी नियंत्रणासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासह परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेत स्वच्छता राखावी.
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT