नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी, नाशिक जिल्ह्यात महायुतीत फूट पडल्याचे दिसून आले. महाबुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी अर्ज दाखल केला; मात्र जागेसाठी हट्ट धरून बसलेल्या मित्रपक्ष भाजपकडून माजी सभापती गणेश गिते यांनी भाजपसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असताना त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत रिंगणात उडी घेतली. याशिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनीही अर्ज दाखल केला.
तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी अर्ज दाखल करत महायुतीला आव्हान दिले. विधान परिषदेच्या नाशिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेला सुटल्यानंतर पक्षाने माजी आमदार दराडेंना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय त्यांचे पुत्र कुणाल दराडेंचा उमेदवारी अर्ज यावेळी दाखल करण्यात आलेला आहे.
यावेळी आमदार अॅड. राहुल ढिकले, आ. सीमा हिरे, आ. किशोर दराडे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, महापौर हिमगौरी आडके-आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेत्या सीमा ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांसह नगरसेवक उपस्थितीत होते. दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादीकडून गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हैसधुणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रदेशाध्यक्षांसह मंत्री भुजबळ आणि जिल्ह्यातील आमदारांशी चर्चा करून उमेदवारी करत असल्याचे मौसधुणे यांनी या प्रसंगी सांगितले. बोडके असो की, म्हैसधुणे या दोघांसोचत यावेळी पक्षाचे कोणतेही नेते, पदाधिकारी उपस्थित नव्हते.
गोकुळ गितेंची एण्ट्री
नाशिकच्या जागेसाठी आग्रही असलेल्या भाजपकडून माजी सभापती गणेश गिते यांनी यापूर्वीच पक्षाकडून तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र, अखेरच्या दिवशी गणेश गिते यांचे बंधू तथा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत धक्का दिला, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाच गोकुळ गिते यांनी गणेश गिते यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारी अर्जावर इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिवसेनेंतर्गत गटबाजी उफाळली
शिवसेनेने दराडेंना उमेदवारी दिल्यानंतर पक्षांतर्गत असलेली गटबाजी उफाळून आल्याचे चित्र आहे. दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकसभा संपर्कप्रमुख आमदार सुहास कांदे गैरहजर होते. तर, पक्षाचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनी दांडी मारली, तर, पक्षाचे अनेक नगरसेवकही गैरहजर होते
राष्ट्रवादीतही फाटाफूट
राष्ट्रवादीकडून बोडके, म्हैसधुणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांच्या समवेत पक्षाचे कोणतेही आमदार वा पदाधिकारी उपस्थित नव्हते. या उलट महायुतीचे उमेदवार दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेत्या सीमा ठाकरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहूनही ठाकरे हे दोघाही उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यासाठी गेले नसल्याचे दिसून आले
जिल्हाधिकारी कार्यालयास जत्रेचे स्वरूप
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखरेचा दिवस असल्याने महायुतीच्या उमेदवारांसह त्यांच्या सर्मथकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी केली होती. याशिवाय अनेक नातेवाईक यावेळी उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदारांची पाठ
महायुतीचे उमेदवार दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ व नरहरी झिरवाळ यांसह एकही आमदार वा नगरसेवक तसेच पक्षाचे पदाधिकारी फिरकले नाही.
संख्याबळ महत्त्वाचे नाही इतिहास पुनरावृत्त करणार :
गोकुळ गिते माझ्याकडे सध्या कोणतेही मोठे राजकीय पद नसले, तरी मी सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहे. आगामी निवडणुकीत मला आ. नरेंद्र दराडे यांचे थेट आव्हान असून, हे आव्हान पेलण्यास मी पूर्णपणे तयार आहे. निवडणूक छाननीनंतर या लढतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे गोकुळ गिते यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोकुळ गिते यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मला महाविकास आघाडीचा (मविआ) अधिकृत पाठिंबा नाही. माजी आ. अनिल कदम यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. मात्र, उमेदवारी अन् त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीतील विजयासाठी केवळ पक्षाचे संख्याबळ महत्त्वाचे असते हा दावा गोकुळ गिते यांनी फेटाळून लावला.
नाशिकच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत ते म्हणाले, राजकारणात नेहमी संख्याबळच महत्त्वाचे असते असे नाही. यापूर्वी या मतदारसंघातून दिग्गज नेते देवीदास पिंगळे आणि दिवंगत वसंतराव पवार हे कोणत्याही मोठ्या पक्षीय संख्याबळाशिवाय केवळ जनसंपर्काच्या जोरावर निवडून आले आहेत. तोच इतिहास वा निवडणुकीत पुन्हा घडेल. पक्षाचे संख्याबळ पाठीशी नसले तरी, सामाजिक कार्यातील अनुभव आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क यांच्या बळावर आपण ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचा विश्वास गिते यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
विश्वासात घेतले जात नाही: बोडके
मी पक्षाचा महाराष्ट्र सरचिटणीस आहे. नुकतीच सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, महायुतीमध्ये आम्हाला योग्य सन्मान आणि स्थान मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात आम्ही राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पक्षाच्या इतर चरिष्ठ नेत्यांसोबत सविस्तर चर्चा केली होती, तसेच त्यांना आमच्या भावना सांगून विनंतीही केली होती.
मात्र, महायुतीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. नाशिकमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे १०७ माजी नगरसेवक आहेत. आज दाखल केलेल्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून याच नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, अशी माहिती देत बोडके यांनी आपल्या पाठीशी मोठे संख्याबळ असल्याचे दावा यावेळी केला. दरम्यान, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी एबी फॉर्मची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले