नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ज्या लढतीकडे लागून राहिले आहेत, त्या नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा महासंग्राम आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी (दि. २२) होणाऱ्या मतमोजणीत नाशिकच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू स्पष्ट होणार असून, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे की प्रचार थांबवतची घोषणा करणारे गोकुळ गिते याचा फैसला अवघ्या काही तासांत होणार आहे.
या निवडणुकीत महायुती विरुद्ध भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवाराने थेट आव्हान दिल्याने लढत कमालीची अटीतटीची आणि इर्षेची बनली होती. महायुतीचे पारडे जड असले तरी पडद्यामागे झालेल्या गुप्त मोर्चेबांधणीमुळे राजकीय वातावरण तापले होते, त्यामुळे ही निवडणूक अखेरपर्यंत चर्चेत राहिली.
महायुती अंतर्गत असलेली धुसफूस, उघड बंडखोरी आणि ऐनवेळी झालेली 'क्रॉस वोटिंग'च्या अंतर्गत दगाबाजी यामुळे या लढतीतील सस्पेन्स आणि थरार शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे. ही निवडणूक आता केवळ उमेदवारांची राहिलेली नसून बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची 'आर-पारची' लढाई बनली अशी होणार मतमोजणी प्रक्रिया आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, त्यासाठी ४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक टेबलवर सर्वात आधी वैध आणि अवैध मते तपासून वेगळी केली जातील. त्यानंतर वैध मतांचे ५०-५० चे गठ्ठ तयार केले जातील. पहिल्या फेरीतच उमेदवाराने निश्चित कोटा पूर्ण केला, तर तो विजयी होईल. पहिल्या फेरीत कोटा पूर्ण न झाल्यास, तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला बाद केले जाईल. त्यानंतर त्याच्या कोट्यातील 'दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची' मते इतर उमेदवारांच्या खात्यात वर्ग करून कोटा पूर्ण केला जाईल.
दराडे विरुद्ध गिते !
महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्यात सरळ आणि थेट 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. भाजपचे दुसरे बंडखोर नेते प्रसाद हिरे यांनी ऐनवेळी दराडे यांना जाहीर पाठिंबा दिला. गोकुळ गिते यांनीही प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीला दिलासा मिळाला होता. मात्र, छुप्या बंडखोरांनी मतदानाचा दिवशी 'क्रॉस वोटिंग' मुळे ही निवडणूक अटीतटीची झाली.
असा निश्चित होईल मतांचा कोटा
या निवडणुकीत एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ जणांनी मतदान केले आहे. विजयी उमेदवारासाठीचा कोटा निश्चित करण्याचे सूत्र पाहता सध्याची स्थिती जर सर्व ६१८ मते वैध ठरली, तर त्याच्या ५० टक्के (३०९) अधिक १ म्हणजेच ३१० मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक असेल. प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी वैध मतांवरूनच कोट्याची अंतिम निश्चिती होईल.