MLC Election pudhari photo
नाशिक

Nashik MLC Election | गिते, हिरेंच्या माघारीनंतरही महायुतीला पराभवाची धास्ती

Nashik MLC Election | शिवसेना नगरसेवक सहलीला रवाना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी माघार घेतली असून, अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनीही प्रचार थांबविला आहे. मात्र, महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयाबाबतची धास्ती कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर दराडेंबाबत नाराज असलेल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी सहलीचे नियोजन केले आहे.

शनिवारी (दि. १३) शिवसेनेचे सुमारे १०० मतदार मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारांना आलिशान वाहनांमधून सहलीसाठी पाठविण्यात आले. शिवसेनेकडे एकूण १७१ मतदार असून, उर्वरित मतदारही पुढील टप्प्यात सहलीत सहभागी होणार आहेत.

महायुतीतील बंडखोरी आटोक्यात आली असली, तरी नरेंद्र दराडे यांच्याबाबत काही मतदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या कार्यकाळात निवडून आल्यानंतर मतदारसंघातील स्थानिक प्रतिनिधींशी पुरेसा संपर्क ठेवला नसल्याची भावना अनेक मतदारांमध्ये असल्याचे सांगितले जाते. त्यातच निवडणुकीतील चुरस कमी झाल्याने काही मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप व राष्ट्रवादीचे मतदार आज जाणार

शिवसेनेच्या उर्वरित ७१ मतदारांसह भाजपचे सुमारे १९० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १०७ मतदार रविवारी (दि. १४) सहलीसाठी रवाना होणार आहेत. या मतदारांच्या वाहतूक व निवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, त्यांची शाही बडदास्त ठेवली जाणार आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान होणार आहे. त्यापूर्वी सर्व मतदारांना एकत्र ठेवण्याच्या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली असून, ते मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी (दि. १७) परतणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT