नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवार (दि. २५) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी, महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. नाशिकच्या जागेबाबात अंतिम निर्णय झालेले नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जागा वाटपाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना-भाजपमधील इच्छुक सैरभैर झाले आहेत.
या इच्छुकांकडून मुंबई आणि जळगावच्या वाऱ्या सुरू आहेत. काही इच्छुक हे मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. दुसरीकडे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज घेतल्याने त्यांची विधान परिषदेच्या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चाचे सत्र सुरू आहे.
महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून, काही जागांवर अद्याप तिढा कायम असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १२ जागांवर, शिंदे गटाची शिवसेना ४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेस १ जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना काही जागांबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. तसेच पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही एकत्र बसून त्यावर मार्ग काढू. अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात मंगळवारी (दि.२६) महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
इच्छुकांकडून फिल्डिंग
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जळगावच्या बदल्यात नाशिकची जागा भाजपकडे येणार म्हणून पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पक्षांतर्गत इच्छुकांनी वरिष्ठांमार्फत फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी काही इच्छुक हे जळगावाला गेल्याची चर्चा आहे. तर काही इच्छुक मुंबईत ठाण मांडून आहेत. शिवसेनेतील इच्छुकांचीही घालमेल सुरू आहे. या पक्षातील इच्छुक मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. वरिष्ठांकडून वेट अॅण्ड वॉच सांगितले जात आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
केदा आहेरांची उडी
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत आता नाफेडचे संचालक केदा आहेरांनी उडी घेतली आहे. आहेर यांनी सोमवारी अचानक अर्ज खरेदी करत धक्का दिला. सर्वपक्षीय संबंध लक्षात घेता आहेर हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीही त्यांच्या सपंर्कात असल्याचे सांगितले जात आहे. देवळा नगपंचायतींवर त्यांची एकहाती सत्ता आहे. माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्याप्रमाणे ते अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
पहिला दिवस निरंक आठ अर्जाची विक्री
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी राजकीय वर्तुळात शांतता पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस निरंक ठरला. मात्र, पहिल्याच दिवशी ५ उमेदवारांनी एकूण ८ नामनिर्देशन पत्रांची खरेदी केली आहे.
विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी अर्ज खरेदी करणारे हे पाचही उमेदवार कुठल्याही मुख्य राजकीय पक्षाचे नसून, त्यांनी अपक्ष म्हणून हे अर्ज घेतले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. अर्ज खरेदी करणाऱ्यांमध्ये सचिन सस्कर (सर्वाधिक ४ अर्ज खरेदी), नाफेडचे संचालक केदा आहेर, फिरोज गफार शेख, प्रतीक खराटे, अजित पवार यांचा समावेश आहे.