मालेगाव : शहरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांत एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फूलजहाँ अतिक अहमद (२४), रा. जाफरनगर असे मृत महिलेचे नाव असून, गेल्या महिनाभरात प्रसूतीनंतर मृत्यू झालेल्या महिलांची ही तिसरी घटना ठरली आहे. या सलग घटनांमुळे रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
याप्रकरणी सामान्य रुग्णालयातील पोलिस कर्मचारी बागूल यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माहितीनुसार, फूलजहाँ अहमद यांची प्रसूती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयात झाली होती. प्रसूतीनंतर काही वेळातच त्यांची प्रकृती अचानक खालावली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पती अतिक अहमद यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, याच रुग्णालयात गेल्या महिन्यात २२ मार्च रोजी साक्षी शंकर वणीस (२१) यांचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला होता. कुटुंबीयांच्या मागणीनुसार शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्यात आले. मात्र, महिनाभर उलटूनही मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर १३ एप्रिल रोजी मळगाव येथील सीमा समाधान आहेर (३२) यांचाही प्रसूतीनंतर मृत्यू झाला होता. आता फूलजहाँ अहमद यांच्या मृत्यूमुळे सलग तिसरी घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण आहे. या सलग घटनांमुळे प्रसूतीनंतरच्या वैद्यकीय व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मातामृत्यूच्या घटनांकडे केवळ अकस्मात मृत्यू म्हणून पाहण्याऐवजी यामागील वैद्यकीय कारणे, उपचारपद्धती आणि निष्काळजीपणाची शक्यता यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक आणि मृतांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सांगळे करीत आहेत