

नाशिक : मागील काही दिवसांपासून सूर्याचा प्रकोप बघावयास मिळत असल्याने, आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. विशेषतः आम्लपित्त, पोटफुगीच्या तक्रारी वाढल्या असून, छातीत जळजळ होत असल्याने रुग्ण थेट रुग्णालय गाठत आहेत. डिहायड्रेशनमुळे (शरीरातील पाण्याची कमतरता) आम्लपित्त आणि पोटफुगीचा त्रास होत असून, अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
उन्हाळा सुरू होताच, अनेकांना आम्लपित्त आणि पोटफुगीचा त्रास जाणवतो. तापमानातील बदल, शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि खाण्याच्या सवयी यामुळे उन्हाळ्यात पचनसंस्था अधिक संवेदनशील बनते. निर्जलीकरण, आहारातील बदल आणि पर्यावरणीय घटक यामुळे उन्हाळ्यात हा त्रास जाणवतो. याचे सर्वात महत्त्वाचे कारण घामामुळे शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. पचनक्रियेसाठी कमी पाणी पिल्याने, पचनक्रिया मंदावण्याबरोबरच, पोटात गॅस तयार होणे व पोट फुगण्याचा त्रास उद्भवतो, पोटातील आम्लाचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो आणि छातीत जळजळ होते. सध्या अशा प्रकारचे रुग्ण वाढले असून, अधिक काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
दैनंदिन सवयी आणि आहारात जाणीवपूर्वक बदल करून व्यक्ती आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याचे रक्षण करू शकतात. तसेच अधिक आरामदायक व निरोगी उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकतात. सध्या उन्हाचा चटका वाढत असल्याने, असे रुग्ण वाढत आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. धवल चोक्सी
खाण्याच्या सवयी त्रासदायक
जास्त मसालेदार, तळलेले आणि बाहेरचे पदार्थ सेवन करणे, रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ खाणे आजाराला निमंत्रण देणारे ठरते. अनियमित खाण्याच्या सवयींमुळे पाचक एन्झाइम्सचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. कॅफीनयुक्त किंवा कार्बोनेटेड पेयांच्या अतिसेवनामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते. उच्च तापमानामुळे भूक कमी होऊ शकते आणि आतड्यांच्या हालचालीत बदल होऊन पचनक्रिया मंदावते. यामुळे अन्न पोटात जास्त वेळ राहू शकते, ज्यामुळे आंबण्याची प्रक्रिया सुरू होऊन गॅस तयार होतो. अयोग्यपणे साठवलेल्या अन्नामध्ये जिवाणूंची वाढ अधिक सामान्य असते. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. उष्णतेमुळे कमी झालेली शारीरिक हालचाल, झोपेतील अनियमितता यामुळे पचनात अडथळे येऊ शकतात