Maherghar Yojana : 'माहेरघर' कडे गर्भवतींची पाठ ! File Photo
नाशिक

Maherghar Yojana : 'माहेरघर' कडे गर्भवतींची पाठ !

माता-बालमृत्यू रोखण्यासाठीच्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

Nashik Maherghar Yojana Pregnant Women

नाशिक : विकास गामणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील माता व बालमृत्यू नियंत्रित करण्यासाठी तीन दिवस आधी आरोग्य केंद्रावर येऊन सुखरूप प्रसूती व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या माहेरघर योजनेकडे जिल्ह्यातील महिलांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ही योजना आधारवड ठरेल, असे आरोग्य विभागाला वाटले होते.

मात्र, मागील पाच वर्षांत या योजनेचा लाभघेतलेल्या गर्भवती महिलांची आकडेवारी निराशाजनक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात प्रारंभी दोन केंद्रे कार्यान्वित होती, मात्र आता त्यांची संख्या ५५ असून, केवळ चार महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे हक्काचे माहेरघर आता नावालाच उरले आहे.

आदिवासी भागात प्रामुख्याने पावसाळ्यात अनेकदा प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्त्यांच्या, वाहनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे महिलांना प्रसूतीसाठी अडचणीचे ठरते. वेळेत प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात दाखल न झाल्यास माता व बालकांना धोका पोहोचून त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. यासाठी राज्याने सन २०११ मध्ये माता आणि नवजात मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत योजना सुरू केली. योजनेंतर्गत एक खोली किंवा 'माहेरघर', ज्याचे * भाषांतर 'आईचे घर' असे केले जाते. ते प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात बांधले जाते.

अशी आहे माहेरघर योजना

आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांत माहेरघर योजना राबवली जाते. अनेकदा प्रसूती जोखमीची किंवा गुंतागुंतीची होण्याची शक्यता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती तारखेच्या तीन ते पंधरा दिवस अगोदर दाखल करण्यास सांगितले जाते. परंतु, आदिवासी भागातील महिला शेतात किंवा मोलमजुरीच्या कामांना जातात. दिवस भरले तरी शेतीकाम सुरू ठेवतात.

सुटी घेणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे त्या प्रसूतीसाठी तीन किंवा पंधरा दिवस दाखल होण्यास राजी नसतात. मात्र, या महिलांना माहेरघर योजनेंतर्गत देखभाल, स्वच्छता आणि आहार व्यवस्थेसाठी दररोज प्रतिलाभार्थी ३०० रुपये व वेगळे २०० रुपये देखभाल खर्चासाठी दिले जातात. या योजनेंतर्गत गर्भवती, तिचे लहान मूल (असल्यास) आणि एक नातेवाईक यांच्यासाठी राहण्याची व जेवणाची मोफत सोय उपलब्ध आहे. रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा वेळेत मिळवून दिल्या जातात. राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबवून दुर्गम भागातील मातांचे जीव वाचवण्याचे व सुरक्षित सुरक्षित मातृत्वासाठी पाऊल उचलले आहे.

पेठ-त्र्यंबक तालुक्यात उदासीनता

आतापर्यंत या केंद्रात एप्रिल व मे या दोन महिन्यांत एप्रिलमध्ये एकूण ३५१ आणि मे महिन्यात ११८ महिलांची प्रसूती झाली. पेठमधील जोगमोडी आणि त्र्यंबकेश्वर येथील चिंचओहोळ या केंद्रात माहेरघर योजनेंतर्गत केवळ चार महिलांनी लाभ घेतला आहे. गत वर्षापासून जिल्ह्यातील ५५ आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत माहेरघर योजना सुरू करण्यात आली असली, तरी पेठ आणि त्र्यंबकेश्वर भागातील केवळ चार महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे योजनेबाबत अद्यापही उदासीनता दिसून येत आहे.

जिल्ह्यात ५५ माहेरघर

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यातील नऊ जिल्ह्यांतील ७८ केंद्रांत माहेरघर योजना कार्यरत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी दोन माहेरघर केंद्रांना मान्यता होती. आता ती संख्या वाढली असून, सद्यस्थितीत ५५ आरोग्य केंद्रांत माहेरघर योजना सुरू झाली आहे. जिल्ह्यात कळवण येथे ९, पेठ ७, सुरगाणा ८, नाशिक २ (धोंडेगाव, जातेगाव), त्र्यंबकेश्वर ७, दिंडोरी १०, इगतपुरी ५, देवळा ३ अशा एकूण ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत माहेरघर केंद्र सुरू आहे.

जिल्ह्यात यापूर्वी केवळ 66 दोन केंद्रात माहेरघर योजना कार्यान्वित होती. आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयांत माहेरघर योजना गत वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. अतिजोखमीच्या, गुंतागुंत टाळण्यासाठी ज्यांना डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. अशा प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनी पंधरा दिवस किंवा वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे.
- डॉ. हर्षल नेहते, माता-बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT