

निफाड (नाशिक) : किशोर सोमवंशी
द्राक्ष, कांदा या पिकांनी निफाड तालुक्याला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख मिळवून दिली. या पिकांमुळे येथील शेतकरी समृद्ध झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाने निसर्गाचा प्रकोप द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या मुळावर उठला आहे. या पिकांवर होणारा भरमसाठ खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी थेट द्राक्षबागांना कुर्हाड लावून अन्य पीक घेण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांवर वाढत असलेले कर्जाचे ओझे व संसाराचा गाडा चालवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कमी जोखमीची पिके घेण्यास सुरुवात केली आहे. कोठुरे येथील शेतकरी सुजय गिते यांनी आपली पारंपरिक द्राक्ष शेती कमी करून जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी पिकाला प्रधान्य दिले. त्यांनी शेतामध्ये 15 एकर द्राक्ष बाग लावलेली होती. मात्र, अस्मानी व सुलतानी संकटांनी गेल्या काही वर्षांत द्राक्ष शेती धोक्यात आल्यामुळे त्यांनी द्राक्ष बागेला फाटा देत केळीची लागवड केली आहे. यासाठी प्रारंभी त्यांनी जैन व सह्याद्री फार्म या कंपनीकडून मार्गदर्शन घेतले. रोपे मिळविली. यंदा त्यांनी साडेचार एकरवर केळीची लागवड केली आहे. या पिकासाठी एकरी दोन लाख रुपये खर्च, तर वर्षात आठ लाख रुपये उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, अशाच प्रकारे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक द्राक्ष पिकाकडून अन्य पिके घेण्याकडे वाटचाल केल्याने याबाबत कृषी क्षेत्रात चर्चा होत आहे.
पंधरा एकर द्राक्ष बाग लावलेली होती. गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष बागेवर निसर्गाची होणारी अवकृपा व मिळणारा अत्यल्प भाव यामुळे बाग तोडून आद्रक, डाळिंब व केळी या पिकांची लागवड केली. यातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सुयोग गिते, कोठूरे, ता. निफाड, जि. नाशिक.
कोरोनाचा फटका जसा विविध क्षेत्रांना बसला, तसा कृषी क्षेत्रालाही बसला. विशेषत: द्राक्ष बागायतदाराला या काळात निर्यातयुक्त द्राक्ष कवडीमोल भावाने तसेच विक्री करावे लागले. त्यानंतही दरवर्षी अवकाळीचा फटका उत्पादनाला बसत आहे. त्यातही द्राक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ घालणे कठीण झाल्याने अनेक शेतकरी इतर पिके घेण्याकडे वळत आहेत.