

सिडको (ठाणे) : अंबड पोलिस ठाणे व सातपूर पोलिस ठाणे यांचे विभाजन करून चुंचाळे व अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्यास गृह विभागाने अखेर परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक उद्योजक, कामगार आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन पोलिस ठाण्याची हद्द हॉटेल संस्कृतीपर्यंत राहणार आहे.
नवीन पोलिस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये अंबड औद्योगिक वसाहत, चुंचाळे वरचे व खालचे, केवल पार्क, नवनाथनगर, पपया नर्सरी, त्र्यंबक रोडवर हॉटेल संस्कृतीच्या मागील परिसर, किरटशेत, बेलगाव ढगा, पिंपळगाव बहुला काही भाग, पांजरपोळ घरकुल आणि अंबड गावाचा काही परिसर या भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महामार्गवरील सीएनजीपासून पाथर्डी फाटापर्यंत महामार्गपर्यंत हद्द असणार आहे. तसेच पपया नर्सरीपासून त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हॉटेल संस्कृतीपर्यंत फुटपाथ, तर मुख्य रस्ता सातपूर पोलिस ठाणे हद्दीत असणार आहे .
या भागात गेल्या काही वर्षांपासून औद्योगिक वाढीबरोबरच कामगारांची व नागरिकांची वस्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत होत्या. अंबड पोलिस ठाण्याची हद्द फार मोठी झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताण वाढला होता. त्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
नवीन पोलिस ठाण्यामुळे स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल, गस्त व पोलिस हस्तक्षेप वेगाने होईल अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे कायदा सुव्यवस्थेला बळ मिळणार असून, परिसराचा सर्वांगीण विकास अधिक गतीने होणार आहे.
चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहतीसाठी नवीन स्वतंत्र पोलिस ठाण्याची हद्द प्रस्ताव तयार आहे फक्त नकाशा मंजुरीनंतर नक्की हद्द समजणार आहे.
विश्वास पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चुंचाळे पोलिस चौकी, नाशिक.