नाशिक : सतीश डोंगरे
देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी घेत, 'एमएसएमई' नोंदणीत देशात अव्वल स्थान कायम राखले आहे. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या उद्यम नोंदणी पोर्टलवरील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ७६ लाख ५४ हजार २० नोंदणीकडून एमएसएमई उद्योग आहेत. त्यात ७५ लाख ६३ हजार ७९४ सूक्ष्म, ८२ हजार ३९१ लघु, तर ७ हजार ८३५ मध्यम उद्योग आहेत. राज्यातील एकूण एमएसएमईपैकी ९८.८२ टक्के उद्योग सूक्ष्म श्रेणीत असून, या सर्व उद्योगांमधून सुमारे २.५ कोटींहून अधिक रोजगारनिर्मिती झाली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार, स्थानिक उत्पादन आणि सेवा क्षेत्राला सर्वाधिक बळ देण्याचे काम या उद्योगांकडून केले जात आहे. उद्योगांचे औपचारिकीकरण वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उद्यम' नोंदणीला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
अनौपचारिक सूक्ष्म उद्योगांना औपचारिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उद्यम असिस्ट प्लॅटफॉर्म (यूएपी) अंतर्गत महाराष्ट्रातील ३३ लाख १३ हजार ५२४ उद्योगांची नोंद झाली आहे. त्यामुळे उद्यम आणि यूएपी मिळून राज्यातील एकूण नोंदणीकृत उद्योगांची संख्या १ कोटी ९ लाख ६७ हजार ५४४ इतकी झाली आहे. एमएसएमई क्षेत्र हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, उत्पादन, सेवा आणि व्यापार या तिन्ही क्षेत्रांमध्ये या उद्योगांचे मोठे योगदान आहे. रोजगारनिर्मिती, निर्यात, स्थानिक गुंतवणूक आणि उद्योजकता वाढविण्यात या क्षेत्राची भूमिका मोठी आहे.
महाराष्ट्र 'एमएसएमई' मध्ये अग्रेसर आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. स्टार्टअप कॅपिटलमुळे महाराष्ट्राची इकॉनॉमिक ग्रोथ ही वेगाने होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप, क्वॉन्टम कॉम्प्युटिंग, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, डेटा सेंटर येत असल्याने, त्यांना लागणारी सपोर्ट सिस्टीम एमएसएमईतून पुरवली जात आहे. या नवीन ओपनिंगमुळे मॅन्युफॅक्चरिंग शिवाय सर्व्हिस क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती यापुढे होणार आहे. उत्पादन क्षेत्रात क्लस्टर तयार होत आहे. कृषी एमएसएमईमध्ये निर्यातीचा वाटा वाढला आहे.- प्रदीप पेशकार, प्रदेशाध्यक्ष, गुड गव्हर्नन्स सेल, महाराष्ट्र
राज्यातील प्रमुख एमएसएमई हब
मुंबई - वाणिज्य, आयटी, फॅशन, मीडिया, निर्यात केंद्र
पुणे - ऑटोमोबाइल, अभियांत्रिकी, आयटी, संशोधन
नाशिक - द्राक्षप्रक्रिया, वाइन, अभियांत्रिकी, कृषी उपकरणे, ऑटो घटक
नागपूर - विद्युत उपकरणे, टेक्सटाइल, फूड प्रोसेसिंग.
कोल्हापूर - साखर, अभियांत्रिकी, फूड प्रोसेसिंग
सोलापूर टेक्स्टाइल, वीज उपकरणे, पंप, अभियांत्रिकी
ठाणे - रसायन, फार्मा, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स
नाशिकमधील एमएसएमईची स्थिती
सूक्ष्म उद्योग - १ लाख २८ हजार ४९६
लघु उद्योग - एक हजार २७१
मध्यम उद्योग - २५३
एकूण एमएसएमई १ लाख २९ हजार २०