

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महानगर परिवहन महामंडळ (सिटीलिंक) तर्फे प्रवाशांना बसमधून प्रवास करताना डिजिटल माध्यमातून तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल तिकीट सुविधेचा गुरुवारी (दि.२५) शुभारंभ करण्यात आला. महापौर हिमगौरी आहेर आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या हस्ते राजीव गांधी भवन बसस्टॉप येथे या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी राजीव गांधी भवन ते कुलकर्णी गार्डन या मार्गावर सिटीलिंक बसमधून प्रवास करून डिजिटल पद्धतीने तिकीट काढत नव्या सुविधेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
नागरिकांनी सिटीलिंकच्या या डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सिटीलिंकच्या नव्या यंत्रणेमुळे प्रवाशांना आता बसमध्येच कोणत्याही यूपीआय अॅपद्वारे तसेच डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्वरित, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने तिकीट घेता येणार आहे.
यामुळे तिकीट वितरण प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार असून, रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सुट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात उद्भवणारे वादही टाळता येणार आहेत. या प्रसंगी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांनी सिटीलिंककडून प्रवाशांसाठी तंत्रज्ञानाधारित, स्मार्ट आणि प्रवाशाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.
डिजिटल तिकीट प्रणाली ही त्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, महाव्यवस्थापक (वाहतूक) राहुल तोरो, महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिकी) रघुनाथ कांबळे, उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सुर्वे, उपमहाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिकी) विकास जोशी, जनसंपर्क अधिकारी तथा प्रशासन व्यवस्थापक दीपाली घाटोळ, आदी उपस्थित होते. नाशिक महानगर परिवहन महामंडळाने नाशिककर नागरिकांना डिजिटल तिकीट सुविधेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. नव्या सुविधेमुळे सिटीलिंकची सेवा अधिक आधुनिक, सुलभ आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार असल्याचे सांगण्यात आले.