

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे केंद्र असलेल्या नाशिकरोड बसस्थानकात पडलेले मोठमोठे खड्डे, पावसामुळे साचणारे पाणी, वाहतूक कोंडी आणि चारही बाजूंनी पडलेल्या रिक्षांचा विळख्यामुळे प्रवासी, व्यावसायिक आणि बसचालक त्रस्त झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाची मागणी होत असतानाही अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी आठ महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. काम सुरू होणार असल्यामुळे बसस्थानकातील व्यावसायिकांना दुकाने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले. मात्र, दोन महिने उलटूनही प्रत्यक्ष काँक्रिटीकरणाचे काम सुरू झालेले नाही.
त्यामुळे रिकाम्या जागेत आणि खड्डेमय परिसरात प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाला असल्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यांत पाणी साचून चिखल आणि घसरड्या रस्त्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दररोज ४०० ते ५०० गाड्या एक हजारांहून अधिक फेऱ्या या स्थानकातून होत असल्यामुळे येथील सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
आंदोलनाचा इशारा देऊनही दुर्लक्ष
बसस्थानक दुरुस्ती व काँक्रिटीकरणासाठी विविध पक्ष, संघटना आणि प्रवासी संघटनांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली आहेत. मात्र, ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट बसस्थानक अधिकच खराब होत आहे. या ठिकाणी १७ पैकी फक्त दोनच सीसीटीव्ही सुरू आहेत. त्यामुळे या बसस्थानकात चोऱ्यांची संख्या वाढतच आहे.
महापालिका आणि परिवहन मंडळाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार व निवेदने दिली आहेत. काँक्रिटीकरणाची निविदा होऊन आठ महिने झाले, तरी काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यात प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
- गौतम सोनवणे, उपाध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना