नाशिक

Nashik Leopard News : कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

गणेश सोनवणे

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भीमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर १३८ मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दुपारी तीनच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली. हातातली कामे सोडून सर्व जण दूर पळाले. मात्र, बिबट्या हालचाल करत नसल्याने हिंमत करत काही तरुण जवळ गेले असता तो मृत झाल्याचे आढळून आले.

याबाबत स्थानिकांनी वावी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक पारस वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, वनपाल अनिल साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर नारायण वैद्य, रामनाथ आगिवले, संतोष मेंगाळ यांनी बिबट्याचा मृतदेह नांदूरशिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात हलवला. तेथे मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या नर बिबट्याचे वय पाच वर्ष होते. अन्नातून विषबाधा झाल्याने या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. नांदूरशिंगोटे वनक्षेत्रात या बिबट्यावर वनविभागाच्या संकेताप्रमाणे अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT