शिरोडा ग्रामपंचायत ग्रामसभा : “छत्रपती शिवाजी महाराज” सभागृह करण्याच्या मागणीला यश | पुढारी

शिरोडा ग्रामपंचायत ग्रामसभा : "छत्रपती शिवाजी महाराज" सभागृह करण्याच्या मागणीला यश

वेंगुर्ले – पुढारी वृत्तसेवा : शिरोडा ग्रामपंचायतची २६ जानेवारी रोजीची तहकूब झालेली ग्रामसभा बुधवार १४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने यावेळी सभेस उपस्थित ग्रामस्थांचा ग्रामपंचायत वरील रोष पाहायला मिळाला. उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी मागील सर्व ठरावांचा मागोवा घेण्यास भाग पाडल्याने ही सभा प्रचंड गदारोळात पार पडली.

संबंधित बातम्या –

तहकूब ग्रामसभेवेळी सुरुवातीला अध्यक्ष सरपंच लतिका रेडकर यांच्या परवानगीने ग्रामविकास अधिकारी यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचले. अजेंडावरील विषयाप्रमाणे शासकीय परिपत्रकांचे वाचन केले. रोजगार हमी योजना विषयी विस्तृत माहिती दिली. त्यानंतर आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.

हर्षा परब, प्राची नाईक, शीतल साळगावकर, संध्या राणे व इतर बचत गट महिला प्रतिनिधी ग्रामसभेस उपस्थित होते. त्यांनी महिला रोजगार योजनाविषयी खास महिला ग्रामसभा घेतल्या. प्रत्येक वॉर्डमधील गरीब – गरजू होतकरू महिलांना लाभार्थी यादीत समाविष्ट करून घेण्याची मागणी करुन तसा ठराव संमत करून घेतला.

ग्रामपंचायत मालकीचे पर्यटन सुविधा केंद्र हे १० महिन्यांपूर्वी करार पद्धतीने देऊन ही या कालावधीत हॉटेल चालविण्यास घेणाऱ्या व्यावसायिकाकडून ग्रामपंचायत मार्फत नियमाप्रमाणे करारपत्र करून घेतले नाही. या प्रकरणावर ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश बांदेकर, सुधीर नार्वेकर, राजन धानजी यांनी आक्षेप घेतलेला होता.

त्यावेळी वरिष्ठ अधिकारी जवळ केलेल्या तक्रारी व वापरलेल्या शब्दावर सदस्य व ग्रामस्थांनी हरकत घेतल्यावर सरपंचांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे चुकीच्या पद्धतीने निविदा खुली केल्याबद्दल आक्षेप घेतलेले टेंडरही रद्द करून रिटेंडर करण्याचे आश्वासन दिले.
शिवप्रेमींच्यावतीने माजी सरपंच मनोज उगवेकर, लक्ष्मीकांत कर्पे, अशोक परब, मनोहर होडावडेकर यांनी ग्रामपंचायत हॉल नं. २ चे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” करण्याविषयी ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या निवेदनावर मागील २ ग्रामसभेत निर्णय न घेता प्रलंबित ठेवल्याने या विषयी ग्रामस्थांकडून विचारणा करण्यात आली.

उपस्थित माजी सरपंच बाबा नाईक, विजय पडवळ, माजी उपसरपंच राहुल गावडे, प्रवीण धानजी, माजी सदस्य कौशिक परब, संजय फोडनाईक तसेच तातोबा चोपडेकर, आपा साळगावकर, किशोर तांडेल, संतोष अणसुरकर, उद्धव उगवेकर, सुहास निकम व इतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन शिवजयंतीच्या निमित्ताने नामकरण करण्याचा ठराव संमत करून घेतला.

इतर प्रलंबित ठरावावर योग्य निर्णय घेण्याची त्वरित कार्यवाही करण्याची व ८ दिवसात लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” नामकरण ठराव सर्व संमतीने संमत झाल्याने उपस्थित सर्व ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

सरपंच, उपसरपंच यांनी पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अनधिकृत मोटर पंप लावणाऱ्या पाणी योजना लाभार्थींवर कारवाई करण्याचे सूचित केले. यावेळी ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे दीड वर्षांपूर्वी अंदाजे २.३० कोटींची जलजीवन मार्फत मंजूर केलेली पाण्याची टाकीच्या कामात दिरंगाई करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला ग्रामपंचायत मध्ये बोलावून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

शिरोडा यशवंतगड रस्ता, नियोजित महात्मा गांधी स्मारक तसेच वेळागर येथील ताज प्रकल्पाबाबत खास सभा घेऊन गाव विकासाच्या दृष्टीने योग्य तो पाठपुरावा करण्याबाबतची मागणी उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आली. ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याचा रोष ग्रामस्थांमध्यें असल्याने विकास कामाच्या विविध प्रश्नांची सरबत्ती यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर करण्यात आली.

जाब विचारण्यासाठी आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने ग्रामभेतील बैठक व्यवस्था कमी पडली. अखेर प्रचंड गदारोळात शिरोडा ग्रामपंचायत ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेत सदस्य मयुरेश शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच चंदन हाडकी, ग्रामविकास अधिकारी अमृतसागर, ग्रा. पं. सदस्य प्रथमेश बांदेकर, सुधीर नार्वेकर, राजन धानजी, रश्मी डिचोलकर, हेतल गावडे, पांडुरंग नाईक, नंदिनी धानजी, जयमाला गावडे, अनुष्का गोडकर, अर्चना नाईक उपस्थित होते.

Back to top button