Nashik Kumbh Mela 2027  file photo
नाशिक

Simhastha Kumbh Mela 2027: साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा; भूसंपादनासाठी सरकारकडून 2,267 कोटी मंजूर

Simhastha Kumbh Mela 2027 | तपोवनात उभारणार भव्य साधुग्राम; ११५० एकर जागा संपादित करण्याच्या हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिकः पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वास्तव्यासाठी साधू-महंतांच्या उभारण्यात येणाऱ्या तपोवनातील साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने तब्बल २,२६७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रयागराज दौऱ्यावरून परतलेल्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, यंदाच्या कुंभमेळ्यात भाविक आणि साधू संतांची संख्या गेल्या वेळेपेक्षा ५ ते १० 44 पटीने वाढण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन महापालिका हद्दीत एकूण १,१५० एकर जागा संपादित करण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत साधुग्रामसाठी तपोवनात ३७७ एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यापैकी ९४ एकर जागा आधीच संपादित झाली आहे. उर्वरित २८३ एकर जागा संपादन करण्याचे काम सुरू आहे. १,१५० एकरपैकी ७०० एकर जागा केवळ कुंभमेळ्यापुरती तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित केली जाणार आहे.

महामार्ग सन्मुख जमिनींना अधिक दर?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने शासनाला पाठवलेल्या प्रस्तावात रस्त्यालगतच्या जमिनींना अधिक दर देण्याचे सुचवले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महामार्गालगतच्या जमिनींना सुमारे १५ हजार रुपये, तर महामार्गापासून दूर असलेल्या जमिनींना १२ ते १२.५ हजार रुपये दराने मोबदला देण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने याच प्रस्तावाला मान्यता देत २,२६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शेतकऱ्यांचा विरोध आणि महापालिकेचा सुवर्णमध्य ?

२८३ एकर जागेच्या संपादनासाठी महापालिकेने २८० शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून सुनावणी घेतली होती. सुरुवातीला महापालिकेने ५० टक्के टीडीआर आणि ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. बाजारमूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) या भागातील मूळ दर ७,१९० रुपये प्रतिचौरस मीटर आहे.

तर छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत एका बाजूला १६,९०० रुपये आणि दुसऱ्या बाजूला १०,३८० रुपये प्रतिचौरस मीटर असा दर आहे. काही जागामालकांनी थेट २६,००० रुपये प्रतिचौरस मीटर दराची मागणी केली होती. शेतकऱ्यांचा विरोध पाहता महापालिकेने एक सुवर्णमध्य काढत शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT