Jamner Connection Kumbh Scam
जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली राज्यातील ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी कोणतेही ऑफलाइन टेंडर काढलेले नसतानाही नाशिक महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त श्री. सिंग यांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून पैसे उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या बनावट आदेशांद्वारे तब्बल ४०० ते ५०० कोटी रुपयांच्या कामांचे वाटप केल्याचा दावा करण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याचा आरोप केलेल्या काही ठेकेदारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणातील कथित ‘जामनेर कनेक्शन’ समोर आले असून, महाजन यांनी संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने जामनेर तालुक्यातील दोन, जळगावमधील एक आणि धुळ्याशी संबंधित एका व्यक्तीने बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून ठेकेदारांकडून पैसे घेतल्याचेही तक्रारदारांनी सांगितल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
मात्र, नेमकी किती रक्कम कोणाकडून घेण्यात आली, याबाबत ठेकेदार अद्याप स्पष्टपणे बोलण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र पैसे परत न मिळाल्याने संबंधित ठेकेदारांनी अखेर आपल्याकडे तक्रार केली आणि बनावट वर्क ऑर्डरही सादर केल्याचे महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कथित फसवणुकीत ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर देण्यात आल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांत ठेकेदारांकडून रोख रक्कम तसेच धनादेश स्वीकारण्यात आल्याचेही समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या वर्क ऑर्डरवर शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेला क्यूआर कोड नसल्याचे काही ठेकेदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना या कागदपत्रांबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी संबंधित यंत्रणांकडे चौकशी केली असता कथित बनावटगिरीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात आणखी किती ठेकेदारांची फसवणूक झाली आहे आणि त्यांच्याकडून नेमकी किती रक्कम उकळण्यात आली, याचा तपास सुरू आहे. फसवणूक झाल्याचा दावा करणारे ठेकेदारही सध्या समोर येण्यास धजावत नाहीत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, गिरीश महाजन यांनी महत्त्वाचा खुलासा केला. कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाने एकही ऑफलाइन टेंडर काढलेले नसून, सर्व निविदा प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली आहे. तसेच नुकतीच पात्र ठेकेदारांची अधिकृत यादीही प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री आणि त्यांच्या सचिवांशी चर्चा झाल्याची माहितीही महाजन यांनी दिली. कुंभमेळ्याच्या नावाने अशा किती बनावट वर्क ऑर्डर तयार करून बाजारात फिरवल्या जात आहेत, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून ठेकेदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आता या कथित रॅकेटमागील सूत्रधार कोण, बनावट वर्क ऑर्डर किती ठेकेदारांना देण्यात आल्या आणि या माध्यमातून किती रक्कम उकळण्यात आली, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच फसवणुकीची नेमकी व्याप्ती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका स्पष्ट होणार आहे.