Nashik IT Sector 
नाशिक

Nashik-नाशिकच्या आयटी क्षेत्राला बळ देण्यासाठी जुलैमध्ये 'कॉन्क्लेव्ह'

Nashik-निमा' तर्फ आयोजन : नामाकित कंपन्या होणार सहभागी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक देशातील नवे आयटी डेस्टिनेशन म्हणून पुढे येत असून, जुलै महिन्यात करण्यात येणाऱ्या एका मोठ्या कॉन्क्लेव्हच्या आयोजनामुळे त्यास आणखी बळ मिळणार आहे. नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने प्रशासकीय संस्थांच्या सहकायनि याकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. देशभरातील मोठ्या आयदी कंपन्यांना या कॉन्क्लेव्हमध्ये निमंत्रित केले जाणार आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून नाशिकमध्ये आयटी कंपन्यांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. नाशिक सध्या उद्योगासाठी ऑल टाइम फेव्हरेट ठरत आहे. मुंबई, पुणे येथील मोठे उद्योग समूह विस्तारीकरणासाठी नाशिकला प्राधान्य देत आहेत. आयटी कंपन्यांसाठी देखील नाशिकचे वातावरण अत्यंत पोषक असून, नाशिकमध्ये आयटी कंपन्यांचे जाळे विस्तारले जाऊ शकते.

पुणे आणि मुंबई या दोन्ही प्रमुख आयटी हबच्या भौगोलिकदृष्ट्या शहराला मोठा फायदा मिळत आहे. समृद्ध हवामान आणि रेल्वे, रोड, विमानसेवा अशा देशातील बहुतांश सर्वच राज्यात जाण्यासाठीच्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे आयटी कंपन्यांसाठी नाशिक शहर नवे डेस्टिनेशन बनत आहे. सध्या दोनशेपेक्षा अधिक आयटी कंपन्या नाशिकमध्ये कार्यरत असून, या कॉन्क्लेव्हनंतर हा आकडा वाढण्याची अपेक्षा आहे.

एआयवर मंथन

जुलै महिन्यात होऊ घातलेल्या या आयटी परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजियन्स (एआय), ऑटोमेशन आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग या तीन विषयांवर मंथन केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा कॉन्क्लेव्ह गुंतवणुकीबरोबरच आयटी क्षेत्राची भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

आनंद महिंद्राना निमंत्रण

केंद्रीय वाणिज्य आणि आयटी मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनाही आमंत्रित केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या भव्य सोहळ्यामुळे नाशिकच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

राजूरबहुला, आडगावला जागा

नाशिकमध्ये बहुप्रतीक्षित आयटी पार्कसाठी राजूरबहुला येथे २५ एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय आडगाव येथेही १५ एकर जागा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त आणखी २५ एकर जागा आरक्षित करण्याचे प्रस्तावित असल्याने, कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून नाशिकमध्ये आयटी कंपन्यांसाठी रेड कार्पेट टाकले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT