devendra fadanvis  x
नाशिक

Nashik Investment Summit | नाशिक आता उद्योगांचे 'न्यू मॅग्नेट'! 13 हजार 190 कोटींचे करार आणि 32 हजार रोजगारांची संधी

Nashik Investment Summit | महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचा रोडमॅप तयार असून, त्यात नाशिकची भूमिका महत्त्वाची आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचा रोडमॅप तयार असून, त्यात नाशिकची भूमिका महत्त्वाची आहे. नाशिकचा विकास थांबवता येणे शक्य नाही. आगामी काळात नाशिक हे केवळ धार्मिक शहर न राहता उद्योगांचे नवे मॅग्नेट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

क्षमता आणि सुविधाद्वारे येथील औद्योगिक विकासाला खऱ्या अथनि बळ मिळेल आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ३०० हून अधिक उद्योजकांसोबत १३ हजार १९० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यातून ३२ हजार इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे.

नाशिक येथील हॉटेल ताज येथे बुधवारी (दि. ६) आयोजित कुंभउद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषदेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक हे नवे मॅग्रेट तयार झाले आहे. त्यामुळे नाशिकचा विकास आता थांबणार नाही. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हेही उद्योगासाठी गुंतवणुकीचे ग्रोथ इंजिन होत आहेत. याशिवाय, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना येथे मोठे उद्योग येत आहेत. विदर्भात नवीन मॅग्नेट तयार झालेत.

विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाची मोठी संधी असलेले नाशिक शहर असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात गुंतवणूक व्हावी यासाठीचा 'कुंभउद्योग संगम' उपक्रम अतिशय चांगला आहे. या परिषदेच्या माध्यमातून नाशिक विकासाच्या मुख्य धारेत पुन्हा आले आहे. मागील तीन वर्षांपासून आपण जिल्हा केंद्रित गुंतवणूक परिषद घेत आहोत

. त्यात आतापर्यंत ३१ हजार ९४५ कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात झाली आहे. त्यातून ६६ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारापैकी ७७ टक्के कार्यान्वित झाले आहेत. यात इलेक्ट्रॉनिक्स, कृषी आधारित सेवा, ऑटोमोबाइल, वस्त्रोद्योग, सेवा क्षेत्रासह इतर उद्योगातील गुंतवणुकीचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

भौगोलिक समतोलावर

भर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करायची आहे. त्यात भौगोलिक समतोल असावा, यादृष्टीने काम सुरू आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे आणि महानगर प्रदेश केंद्रित विकास असे धोरण होते. शासनाने जिल्ह्याला विकासाचे केंद्र केले पाहिजे, अशी भूमिका घेतली.

जिल्ह्याच्या क्षमतांचा आणि सुविधांचा उपयोग केला पाहिजे. त्यादृष्टीने केवळ मोठ्या उद्योगांसोबत लघु उद्योगांना प्राधान्य देण्याचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांना गुंतवणूक करताना आणि उद्योग सुरू करताना सुलभ व्हावे यासाठी आपण उद्योगस्नेही धोरण आखले. विविध परवानग्या एक छताखाली आणल्या. त्यासाठी मैत्री सारखी सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. मैत्रीद्वारे तीन लाखांहून अधिक अर्जावर कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर उद्योग सुरू होत आहेत. महाराष्ट्र हे आता स्टार्ट अप्सची राजधानी झाले आहे. राज्यात ३० हजारांहून अधिक स्टार्ट अप्सची सुरुवात झाली आहे. शेती क्षेत्रात स्टार्ट अप्सने क्रांती केली आहे याशिवाय, एक जिल्हा, एक उत्पादनमध्ये मूल्यवर्धन करून राज्य शासन त्या माध्यमातून ग्रॅण्डिंग करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

दोन वर्षांत ५७ हजार कोटींची गुंतवणूक

नाशिक जिल्ह्यातही अनेक उद्योग समूहांनी गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवले असून, त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा सारखी कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करत आहे, जागा उपलब्ध झाल्यास या उद्योगाची त्वरित सुरुवात करण्यात येईल.

याशिवाय, रिलायन्स, लार्सन अॅण्ड टुब्रो यासारख्या उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. अनेक उद्योगसमूह येथे उद्योग विस्तारासाठी इच्छुक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकसाठी आली असून, दावोस येथे झालेल्या परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक राज्य शासनाने आणल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT