प्लास्टिक उद्योग 
नाशिक

Nashik industries shut for five days during Diwali |उद्योगांची चाके ५ दिवस बंद

सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना सुट्टी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : दिवाळीच्या सणानिमित्त सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची चाके रविवार (दि. ८) पासून सलग पाच दिवस थांबणार आहेत. बहुतांश कंपन्यांनी कामगारांना दिवाळीची सुट्टी जाहीर केल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. वर्षभर उत्पादनाच्या प्रक्रियेत व्यग्र असलेल्या कामगारांना या सुट्टीमुळे कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे. शनिवारची साप्ताहिक सुट्टी वगळता रविवार ते गुरुवारपर्यंत बहुतांश कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया बंद राहणार असल्याने औद्योगिक क्षेत्रातील व्यवहारही मंदावणार आहेत.

सातपूर आणि अंबड या नाशिकच्या प्रमुख औद्योगिक वसाहतींमध्ये विविध क्षेत्रांतील लहान मोठे उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये हजारो कामगार कार्यरत असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कंपन्यांकडून कामगारांना काही दिवसांची सुट्टी दिली जाते. यंदाही बहुतांश कंपन्यांनी पाच दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे रविवारपासून औद्योगिक वसाहतींमधील यंत्रांचा आवाज थांबणार असून, उत्पादनाची गतीही काही दिवसांसाठी मंदावणार आहे. वर्षभर उत्पादनाचे उद्दिष्ट, कामाचा ताण आणि वेळेचे बंधन सांभाळणाऱ्या कामगारांसाठी दिवाळीची सुट्टी म्हणजे आनंदाची पर्वणी ठरणार आहे. अनेक कामगार कुटुंबीयांसह गावी जाण्याच्या तयारीत आहेत, तर काही जण नाशिकमध्येच कुटुंबासोबत सण साजरा करणार आहेत.

पोलिस देणार गस्त

कारखाने पाच दिवस बंद राहणार असल्याने औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. बंद काळात चोरी, घरफोडी अथवा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी उद्योजक आणि पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. कंपन्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औद्योगिक परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, नाकाबंदीचेही नियोजन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT