नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिवाळ्याची चाहूल लागताच आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांची पावले उद्याने आणि जॉगिंग ट्रॅककडे वळू लागली आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात चालणे, धावणे आणि व्यायाम करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असताना, दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकचेच आरोग्य बिघडल्याचे चित्र आहे.
इंदिरानगर परिसरातील स्टेट बँक कॉलनीजवळ असलेल्या व्यायामप्रेमी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुटलेले कठडे, मोडकळीस आलेली ग्रीन जीम, उघडे नाले आणि अस्वच्छ शौचालयांमुळे जॉगिंग आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग साचले असून, कचराकुंड्या असूनही परिसरात सर्वत्र कचरा विखुरलेला आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहत आहेत. बेसुमार वाढलेल्या गवतामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. धुळीचे लोट, उघड्या नाल्यांची दुर्गंधी आणि उखडलेल्या ट्रॅकमुळे व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होत आहे.
जॉगिंग ट्रॅकच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या जाळ्यांपैकी अनेक जाळ्या चोरीला गेल्या आहेत. ट्रॅकचे कठडे तुटले असून, अंतर्गत डिव्हायडरचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी डिव्हायडर गायब झाल्याने ट्रॅकची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांच्या व्यायामासाठी उभारण्यात आलेल्या ग्रीन जीममधील साहित्य तुटले असून, देखभालीअभावी ते धूळखात पडले आहे. स्वच्छतेअभावी अॅक्युप्रेशर ट्रॅकही वापराविना पडून आहे.
महिलांसाठी स्वतंत्र राखीव ठेवण्यात आलेल्या ग्रीन जीममध्येही इतरांचा वावर दिसून येत आहे. परिसरातील उघड्या नाल्यांमधून दुर्गंधी पसरत असून, शौचालयांची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. महिला आणि पुरुषांसाठी असलेली प्रसाधनगृहे वापरण्यायोग्य नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी मद्यपी आणि नशेखोरांचा वावर वाढत असल्याच्या तक्रारी आहेत.
शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था भयावह आहे. त्यांचे पुनःनिर्माण करावे लागेल. सर्वत्र महिला आणि पुरुषांच्या प्रसाधनगृहांची अवस्था गंभीर असून, ती वापरण्यायोग्य राहिलेली नाहीत. स्वच्छतेचा अभाव आहे. देखभाल-दुरुस्तीचा तर अजिबात मागमूस नाही. महापालिकेने या सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.