Bogus doctors  File Photo
नाशिक

IMA Nashik Doctors Strike | डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील आरोग्यसेवा बंद

IMA Nashik Doctors Strike | डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या जिल्ह्यातील आरोग्यसेवा २४ तास बंद; 'आयएमए'ची घोषणा, १० हजार डॉक्टर सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी (दि. २०) राज्यभर २४ तास नियमित आरोग्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी (दि. २१) सकाळी ६ पर्यंत हा बंद पाळला जाणार आहे.

या बंदमध्ये जिल्ह्यातील तब्बल १० हजार डॉक्टर्स सहभागी होणार असल्याची घोषणा आयएमए अध्यक्ष डॉ. विशाल पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. डॉ. पवार म्हणाले, आरोग्यसेवा हिंसामुक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात आधुनिक वैद्यक (ॲलोपॅथी), आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच इतर वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, विविध वैद्यकीय संघटना, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित संघटनांचा सहभाग राहणार आहे. नाशिकमध्ये आयएमएसाह निमा, एफपीए, एमपीए, न्यू निमा, पंचवटी मेडिकल असोसिएशन, सातपूर Medical असोसिएशन, देवळाली मेडिकल असोसिएशन, मार्ड, नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन आदी संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी १० वाजता आयएमएकडून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेसाठी डॉ. पंकज भट, डॉ. मयूर सरोदे, डॉ. स्वप्निल खैरनार, डॉ. अमोल वाजे, डॉ. विजय मुंदडा, डॉ. सचिन देवरे, डॉ. स्वप्निल महाले, डॉ. तुषार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

या सेवा राहणार बंद

बंदच्या काळात नियमित ओपीडी, नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर नियमित वैद्यकीय सेवा स्थगित राहतील. मात्र आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार अखंडित सुरू राहणार असल्याचे आयएमएतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

.. तर बेमुदत बंद

आयएमएच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास येत्या ९ ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही आयएमएतर्फे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT