Ganesh Immersion Procession Route |  AI Image
नाशिक

Ganesh Immersion Procession Route | नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग बदलणार; पंचवटी कारंज्यावरून नवा रूट प्रस्तावित

Ganesh Immersion Procession Route | महापौर-आयुक्त संयुक्त पाहणी करून निर्णय घेणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रामकुंड परिसरात रामकाल पथासह विविध सिंहस्थ कामे सुरू असल्याने यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पंचवटी कारंजापुढे नेता येणे शक्य नाही. यामुळे मिरवणूक मार्गात अडथळा निर्माण होऊन गणेश मंडळांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मार्गात बदलाची मागणी पुढे आली असून, पंचवटी कारंजावरून पुढे जुना आडगाव नाका, गणेशवाडीमार्गे मिरवणूक गौरी पटांगणापर्यंत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

यासंदर्भात महापौर हिमगौरी आहेर-आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाचा संयुक्त पाहणी दौरा केला जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील स्थायी समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि. १५) महापौर आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेण्यात आली.

उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त, खड्डेमुक्त करण्याच्या प्रशासनाला सूचना देताना रामकुंड परिसरात सुरू असलेल्या सिंहस्थ कामांमुळे मिरवणूक मार्गात येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.

पंचवटी कारंजापुढे मिरवणूक न गेल्यास गणेशोत्सव मंडळांना मोठा त्रास सोसावा लागेल. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मिरवणूक मार्ग पुढे जुना आडगाव नाक्यापर्यंत नेऊन गणेशवाडीमार्गे गौरी पटांगणापर्यंत आणता येणे शक्य असल्याचा विचार बैठकीत मांडण्यात आला. यावर संयुक्त पाहणीद्वारे निर्णय घेण्याचे महापौरांनी सांगितले.

५,६९८ तक्रारी प्रलंबित

एनएमसी ई-कनेक्ट ॲपवरील नागरिकांच्या तक्रारींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. गेल्या आठवड्यापर्यंत सुमारे आठ हजारांहून अधिक तक्रारी प्रलंबित होत्या. गेल्या तीन-चार दिवसांत तब्बल अडीच हजार तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, सद्यस्थितीत विविध विभागांशी संबंधित ५६९८ तक्रारी प्रलंबित असल्याचे उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी सांगितले. यात बांधकाम विभागाशी संबंधित खड्डे व पावसाळी गटारांसंदर्भात सर्वाधिक २६२६ तक्रारी असून, त्याखालोखाल नगररचना विभागाशी संबंधित तक्रारी आहेत. तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

उपमहापौरांनी गोंजारले, स्थायी सभापतींनी फटकारले

सिंहस्थानिमित्त प्रथमच नाशिकला इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असल्याने या निधीतून केली जाणारी कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत. नाशिकची बदनामी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे उपमहापौर विलास शिंदे यांनी सांगितले.

उपमहापौरांकडून गोंजारण्यात येत असताना स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी मात्र अधिकाऱ्यांना जोरदार फटकार लगावली. प्रशासकीय राजवटीत कामे झाली असती तर शहरात आज खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झालाच नसता, असा संताप व्यक्त करताना आपल्या प्रभागात सिंहस्थ होत असूनही आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची खंत सभापती सानप यांनी व्यक्त केली.

अधिकारी भेटीसाठी दुपारी ४ ते ६ वेळ

बरेचसे अधिकारी फिल्डवर असल्याचे सांगून महापालिका मुख्यालयातून दिवसभर बाहेर असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडता येत नाही. तर काही अधिकारी बैठकांमध्ये व्यस्त असल्यामुळे फिल्डवर जात नाहीत.

त्यामुळे कामांच्या दर्जावर प्रश्न उभे राहतात. यातून मार्ग काढण्यासाठी अधिकाऱ्यांना मुख्यालयात ४ ते ६ वेळ उपस्थित राहणे बंधनकारक करण्याचे तसेच उर्वरित वेळेत फिल्डवर कामांची जबाबदारी सांभाळण्याची उपमहापौर विलास शिंदे यांनी मांडलेली सूचना महापौर-आयुक्तांनी मान्य केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT