गणेश विसर्जन मिरवणूक  
नाशिक

Nashik Ganesh Visarjan Miravnuk| पोलिसांच्या जाचक अटींवरून नाशिकमध्ये वाद! विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांचे ठिय्या आंदोलन

Nashik Ganesh Visarjan Miravnuk | शहरातील मुख्य गणेशविसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकडी बारव येथून सुरुवात झाली होती.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील मुख्य गणेशविसर्जन मिरवणूक कुठेही रेंगाळू नये, म्हणून पोलिसांकडून सक्ती केली जात असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. एक ते दीड तासानंतर आंदोलन मागे घेतल्याने थांबलेली मिरवणूक हळूहळू पुढे मार्गस्थ होऊ लागली.

शहरातील मुख्य गणेशविसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकडी बारव येथून सुरुवात झाली होती. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर-आडके, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत मानाच्या महापालिकेच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

पोलिसांनी प्रत्येक मंडळाला एका ढोल पथकाची मर्यादा लागू केली होती. महापालिकेच्या मिरवणुकीत दोन ढोल पथके असल्याने एक ढोल पथक काढून घेण्याची सूचना पोलिसांनी केली. त्यावेळी ढोल पथकाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून मुभा मिळवण्यासाठी धडपड केल्याचे सांगितले जाते.

मुख्य विसर्जन मिरवणुकीवर बड्या राजकीय नेत्यांच्या मंडळांचा प्रभाव असतो. प्रभावशाली व्यक्तींची मंडळे अतिशय संथपणे मार्गक्रमण करतात. प्रत्येक चौकात राजकीय पक्ष, संस्था व संघटनांकडून केले जाणारे स्वागत यामुळे वेळेचा अपव्यय होतो. मिरवणूक रेंगाळू नये म्हणून पोलिसांनी गणेश मंडळांच्या बैठकीत आधीच विविध सूचना केल्या होत्या. ढोल-ताशा पथकात ६० ते ७० लोक असतील, वाहनांवर मर्यादा ठेवली जाईल आणि मिरवणूक लवकर पुढे जाईल, असे पोलिसांनी नियोजन केले होते.

शुक्रवारी मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर दोन मंडळांमध्ये अंतर पडू नये, यासाठी पोलिस प्रयत्नरत होते. गणेश मंडळे व वाद्य पथकांना मिरवणूक पुढे नेण्याच्या सूचना केल्या जात होत्या. त्यामुळे महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ या मंडळांचे गणपती अशोक स्तंभ, महात्मा गांधी रस्त्यापर्यंत आले.

सायंकाळी चार वाजता पाठीमागून श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ आणि सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळाचे गणपती येत होते. पोलिसांकडून पुढे जाण्यासाठी सक्ती केली जात असल्याने कार्यकर्ते चिडले. नाशिकचा राजा आणि साक्षी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगली बँक सिग्नल आणि मुंदडा मार्केट येथे ठिय्या आंदोलन सुरू केले. गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष तथा सूर्यप्रकाश नवप्रकाश मंडळाचे अध्यक्ष समीर शेट्ये आणि अन्य पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले.

दीड तास मिरवणूक थांबवून:

सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पतकी, प्रवीण चव्हाण, डॉ. अंचल मुद्गल आदींनी संबंधितांशी चर्चा केली. अर्धा ते पाऊण तासानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र, मिरवणूक थांबलेली होती. मिरवणूक मार्गावर पुढे गेलेली मंडळे आणि मागील गणेश मंडळांचे गणपती सुमारे दीड तास जागेवरच थांबून होते. नंतर हळूहळू मिरवणूक पुढे मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT