Traffic Children Park  
नाशिक

Traffic Children Park | ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कसाठी 'नाशिक फर्स्ट'ला अल्टिमेटम

Nashik First Traffic Park-ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कसाठी 'नाशिक फर्स्ट'ला अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मुंबई नाका येथील ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क पुन्हा सुरू करण्यासाठी महापौर हिमगौरी आहेर आडके आणि अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी केलेल्या प्रयत्नांनंतरही 'नाशिक फर्स्ट' संस्थेकडून करार मुदतवाढीसंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संस्थेला करारनामा करण्यासाठी अंतिम स्मरणपत्र देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास हा प्रकल्प मक्तेदार अथवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माध्यमातून सुरू करण्याचा पर्याय प्रशासन विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पहिल्याच महापालिकेच्या महासभेत नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचे संचालन करणाऱ्या 'नाशिक फर्स्ट'च्या कारभारावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या नाशिक फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचा प्रकल्प बंद करण्याची भूमिका घेत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारा हा उपक्रम बंद पडू नये, या भूमिकेतून महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी २० मे रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यां-समवेत महापौर दालनात बैठक घेतली होती.

बैठकीत संस्थेची बाजू ऐकून घेतल्यानंतर महासभेने 'नाशिक फर्स्ट विरोधात कोणताही ठराव मंजूर केला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रकल्प सुरू राहावा, यासाठी संस्थेच्या कराराला मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांनी दोन वेळा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून करारनामा करण्यासाठी चर्चेसाठी बोलावल होते. मात्र, संस्थेकडून प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे आता अंतिम स्मरणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतरही करार झाला नाही, तर ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कचे संचालन मक्तेदार किंवा सीएसआरच्या माध्यमातून करत हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय मनपा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून प्रकल्प बंद असल्याने शहरातील शालेय विद्यार्थी आणि नागरिक वाहतूक जनजागृतीच्या या महत्त्वाच्या उपक्रमापासून वंचित आहेत. त्यामुळे ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मनपा आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT