Nashik Kumbh Mela 2027  Pudhari News Network
नाशिक

Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थ कुंभमेळा साधुग्राम वाद पेटला; 1000 एकर जमीन अधिग्रहणास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Simhastha Kumbh Mela 2027 | साधुग्रामसाठी एक इंचही जागा देणार नाही; नाशिकमधील शेतकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी साडेतीनशे एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही जागेवर आरक्षण टाकण्यास विरोध दर्शवित तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर १००० एकर जागा अधिग्रहीत करण्यासही जागामालक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला असून, न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंत व भाविकांची संख्या यंदा पाच ते दहा पटीने वाढणार आहे. या साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी साधुग्राममधील १३७७ एकर जागेवर साधुग्रामची उभारणी प्रस्तावित आहे.

सद्यस्थितीत तपोवनातील ३७७ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण टाकण्यात आले असून, यापैकी ९४ एकर जागा संपादित करण्यात आली आहे. उर्वरित २८३ एकर जागा संपादन करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.

२८३ एकर भूसंपादनासाठी महापालिकेने २८० शेतकऱ्यांना नोटीस पाठवून यापूर्वी सुनावणी घेतली. त्यापूर्वी ५० टक्के टीडीआर व ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला देण्याची तयारी दर्शविली होती.

परंतु शेतकऱ्यांनी प्रस्तावाला ठोसपणे विरोध केला. महापालिकेकडून भूसंपादनाचा मोबदला बाजारमूल्य तक्त्यानुसार दिला जाणार आहे. मुळात त्या भागात ७,१९० रुपये प्रतिचौरस मीटर असा दर आहे. महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर महामार्गालगतच्या जमिनींना पंधरा हजार रुपये एकर, तर महामार्गापासून दूर असलेल्या जमिनींना बारा ते साडेबारा हजार रुपये एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे.

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भूसंपादन दरावर शिक्कामोर्तब होईल. परंतु दुसरीकडे तात्पुरत्या स्वरूपात 'भाडेतत्त्वावर जागा संपादित करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यास शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे.

नांदूर, दसक भागात जागेचा अहवाल

साधुग्राम जागा अधिग्रहणासाठी गेल्या दोन दिवसांपासून मुंबई जमीन अधिग्रहण अधिनियम कायदा १९४८ च्या कलम ५ नुसार सक्षम प्राधिकारी यांचा स्थळ निरीक्षण अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. गावाचे नाव, सर्व्हे क्रमांक, जमिनीचा प्रकार, जागामालकाचे नाव, मिळकतीची भौगोलिक स्थिती, जागेवरील बांधकामाचा प्रकार, घर, गोठा, फळबाग आदी संदर्भात माहिती घेण्यासाठी नांद्र, दसक, मखमलाबाद येथील महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. जागामालक शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

साधुग्राम १२०० ऐवजी एक हजार एकरवर

साधुग्रामच्या भूसंपादनावरून वाद सुरू असतानाच बांधकाम विभागाने साधुग्रामच्या लेआउटसाठी एक हजार एकर जागेची मागणी नगररचना विभागाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साधुग्रामसाठी १२०० एकर नव्हे, तर एक हजार एकरची आवश्यकता असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच या जागेवर साधुग्राम उभे करण्यासाठी लेआउट टाकून सदरची जागा बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावी, अशी माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली आहे.

साधुग्रामसाठी यापूर्वीच तपोवनातील ३७७ एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे. यापुढे आता शेतकरी एकही इंच जागा देणार नाही. याविरोधात लढा उभारण्यासाठी शेतकरी कृती समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच न्यायालयात दावा दाखल केला जाईल.
- समाधान जेजुरकर, शेतकरी कृती समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT