advertisement 
नाशिक

Nashik- सैन्य भरतीचे बनावट जाहिरातपत्रक

Fake army recruitment advertisement circulates in Nashik- हजारो युवकांची दिशाभूल होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : लष्कराच्या ११६ इन्फन्ट्री बटालियन पॅरा यांच्या वतीने दि. ७ ते १३ डिसेंबर २०२६ या दरम्यान कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आनंद रोड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आल्याचे जाहिरातपत्रक सध्या सोशल मीडिया व विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाले आहे. मात्र, या भरतीबाबत संबंधित ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांशी शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड यांनी संपर्क साधला असता, बटालियनने या जाहिरात पत्रकाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडियावर प्रसारित जाहिरात फलकावर महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आदी राज्यांतील उमेदवारांसाठी दि. ७ ते १३ डिसेंबरदरम्यान भरतीचे वेळापत्रक दर्शविण्यात आले आहे. तसेच सैनिक जनरल ड्यूटी व सैनिक ट्रेड्समन पदांसाठी भरती होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या जाहिरातीवर विश्वास ठेवून, देशाच्या विविध भागांतून हजारो तरुण देवळालीत दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भारतीय सैन्यात भरती होणे हे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या अपेक्षेने युवक हजारो किलोमीटरचा प्रवास करून देवळालीत येतात. मात्र, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिराती व्हायरल झाल्यामुळे युवकांचा वेळ, पैसा आणि परिश्रम वाया जाण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपूर्वीही असाच प्रकार

दोन वर्षापूर्वी देवळाली येथे सैन्य भरतीच्या नावाने अशाच प्रकारची जाहिरात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यावेळीही देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने तरुण देवळालीत दाखल झाले होते. मात्र, भरतीबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर शिवयुवा प्रतिष्ठानच्या वतीने पुढाकार घेऊन ही भरतीची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करणारे जनजागृतीपर बॅनर लावून युवकांना सावध करण्यात आले होते.

युवकांच्या भविष्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे लष्करी प्रशासनाने तातडीने अधिकृत लेखी खुलासा करावा आणि ही जाहिरात कोणी तयार व प्रसारित केली, याची चौकशी करावी.

- प्रमोद मोजाड, अध्यक्ष, शिवयुवा प्रतिष्ठान नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT