नाशिक : सतीश डोंगरे
अमेरिका - इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारमार्ग, वाहतूक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये अनिश्चितता निर्माण झालेली असतानाही नाशिकच्या निर्यात क्षेत्राने दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून २७ हजार ३२५ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १२.४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या एकूण निर्यात अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालेला नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याची निर्यात २०२४-२५ मध्ये २४ हजार २९७ कोटी रुपये होती. त्यात एका वर्षात ३ हजार २८ कोटींची भर पडली. नाशिक विभागाची निर्यातही ३१ हजार ६४१ कोटी रुपयांवरून ३५ हजार ३२१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विभागाच्या एकूण निर्यातीत जिल्ह्याचा वाटा सुमारे ७७.४ टक्के आहे.
नाशिकची निर्यात आता केवळ कांदा आणि द्राक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अभियांत्रिकी व वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे, प्लास्टिक उत्पादने, कृषी आधारित माल, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, वस्त्रोद्योग तसेच औषधनिर्मिती या क्षेत्रांनी निर्यातीला मोठा आधार दिला आहे. या विविधतेमुळे एखाद्या विशिष्ट देशातील किंवा बाजारपेठेतील अडचणींचा नाशिकच्या निर्यात व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता कमी झाली आहे.
"वस्तूंच्या किमती वाढल्या असल्या, तरी मागणी असल्यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, श्रीलंका, दुबई, अबुधाबी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिकच्या वस्तू निर्यात केल्या जात आहेत. फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचाही फायदा निर्यातीला होत आहे. निर्यातीबरोबरच आयातीतही वाढ झाली आहे."— सी. एस. सिंग, चेअरमन, एमसीआयएए
नाशिकच्या निर्यातीत अमेरिकेचा वाटा महत्त्वाचा असून, २०२५-२६ मध्ये अमेरिकेला ३ हजार ३८० कोटी रुपयांची निर्यात झाली. औषधे, वाहनांचे सुटे भाग, बेअरिंग, गॅस अथवा तेलासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी पाईप, एसी जनरेटर यांसारख्या औद्योगिक उत्पादनांना अमेरिकेत मागणी आहे. अमेरिकेने भारतावर १०० टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र, अमेरिकेचे टॅरिफ अस्त्र निष्प्रभ झाल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातून २०२५-२६ च्या हंगामात १.४० लाख टन द्राक्षांची निर्यात झाली. मागील वर्षी हा आकडा १.६० लाख टन होता. त्यामुळे ९.६ टक्के घट झाली आहे. यंदाच्या निर्यातीत ७९ हजार टन द्राक्षे युरोपीय देशांमध्ये, तर ६२ हजार टन द्राक्षे युरोपाबाहेरील बाजारपेठेत गेली. मात्र, केवळ अमेरिका-इराण संघर्ष कारणीभूत नाही, तर २०२५ मध्ये झालेला दीर्घकाळाचा अवकाळी पाऊस, कमी सूर्यप्रकाश आणि त्यानंतर मार्च-एप्रिल २०२६ मधील गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादन आणि निर्यातक्षम मालाचे प्रमाण घटले आहे.
नाशिकमध्ये वाहन उद्योगाशी संबंधित सुटे भाग, औषधे, अभियांत्रिकी उत्पादने, विद्युत उपकरणे, प्लास्टिक, प्रक्रिया अन्न आणि अन्य औद्योगिक उत्पादनांची निर्यात सातत्याने वाढत आहे.
त्यामुळे कृषी उत्पादनांच्या तुलनेत औद्योगिक निर्यात नाशिकच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देत आहे. युद्ध, निर्बंध आणि जागतिक वाहतूक आव्हानांच्या काळातही २७ हजार ३२५ कोटी रुपयांची निर्यात नोंदविणे ही नाशिकच्या औद्योगिक व कृषी अर्थव्यवस्थेची प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता दर्शवणारी बाब आहे.