पचनसंस्थेतील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे मुख होय. साधारणपणे मुख या घटकांतर्गत ओठ, दात, गाल, वरचा व खालचा जबडा, जीभ या अवयवांचा अंतर्भाव होतो. शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी मुख सुस्थितीत असणे हे महत्त्वाचे आहे. मानव हा आहाराव्यतिरिक्त सुखासाठी विविध व्यसनाकडे वळला. मानवाला व्यसनामुळे होणारे आजार भरपूर आहेत. त्यामधील एक आजार म्हणजे मुख कर्करोग होय.
गुटखा, हुक्का, तंबाखू, खर्रा जरा, मावा, पान मसाला, विडी, सिगारेट ही व्यसने मुख कर्करोगास कारणीभूत ठरतात. वास्तविक, ही व्यसने माणूस टाळू शकतो. मात्र, मानवी मेंदूमध्ये थोडा वेळ हॅप्पी हार्मोन्स जसे शिरोटॉनिन, एमपीटामाईन तयार होत असल्याने, माणूस या व्यवसनांच्या आहारी जातो. पुढे हीच व्यसने मृत्यूला कारणीभूत ठरतात.
मुख कर्करोग पूर्व व्याधी : मुख कर्करोग होण्यापूर्वी तोंडामधील अवयव विविध अवस्थांमधून जातात. शेवटची अवस्था म्हणजे कर्करोग. प्राथमिक अवस्थेमध्येच जर व्यसनाला आळा घातला, तर व्रण पूर्ववत होऊन तो अवयव कालांतराने सुस्थितीत निरोगी होतो. तोंडामधील लाल व पांढरे डाग हे पुढे कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतात. मुख कर्करोगाची कारणे मुख कर्करोगाची प्रमुख कारणे भारतामध्ये तरी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हेच आहेत. तंबाखूमधील निकोटीन हा प्रामुख्याने व्यसनवाढीसाठी कारणीभूत आहे.
दारू : दारूमुळे तोंडातील आवरणाला कोरडेपणा येतो. दारूमधील घटक हेसुद्धा मुख कर्करोग होण्यास कारणीभूत असतात. तंबाखू व दारू हे दोन्ही व्यसन करणाऱ्या व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता दाट असते. तोंडामध्ये दात नसणाऱ्या रुग्णांना अयोग्य पद्धतीने बनवलेली कवळीसुद्धा मुख कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकते. टोकदार दात किंवा दातांमध्ये भरलेले टोकदार किंवा खरखरीत सिमेंटसुद्धा कर्करोगास कारण ठरते.
मुख कर्करोगाची लक्षणे
सुरुवातीला कर्करोगाच्या गाठी किंवा व्रण यांचा काही त्रास जाणवत नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये तोंडातील त्वचा पांढरी किंवा लाल दिसते. अल्सर तयार होतो. अल्सरचे रूपांतर गाठीत होते. गिळण्यासाठी त्रास होणे, आग होणे, चावण्यासाठी त्रास होणे, कान दुखणे, तोंडातील जखमांमधून रक्तस्राव होणे, तोंड अर्धवट किंवा पूर्णपणे न उघडता येणे ही लक्षणे दिसतात. तोंडातील अल्सरचा आकार वाढून त्यामधून रक्तस्राव होतो. त्या जखमेमधून गाव तयार होते. ही गाठ कधी कधी इतक मोठी होते की, रुग्णाला जेवण करण सुद्धा जिकिरीचे होते.
बायोप्सी : प्रथमतः रुग्णांनी मुख कर्करोग तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गाठीचा काही भाग काढून प्रयोगशाळेत पाठवून, तपासणी ही आधुनिक वैद्य क्षेत्रातील गोल्ड स्टैंडर्ड टेस्ट आहे.
एमआरआय : याद्वा कर्करोगबाधित अवयव पेशी व निरोग पेशी ओळखल्या जातात. कर्करोगाची व्याप्ती कळण्यास मदत होते. टीएमएम तपासणीद्वारे कर्करोगाची गाठ, त्याची अवस्था व स्टेज कळते.
कर्करोगातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी नियमितपणे सकस आहार, व्यायाम, प्राणायाम चालू ठेवले, तर शरीर परत पूर्ववत होऊन निरोगी आयुष्य जगता येते. यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन व्यसन टाळ्या व मुख कर्करोग पळवूया ही शपथ घ्यावी.- डॉ. विशाल जाधव, मुख कर्करोग तज्ज्ञ, नाशिक.