death  file photo
नाशिक

Nashik Utility Work Safety | खड्याने घेतला माजी सैनिकाचा जीव

Nashik Utility Work Safety | सातपूरमध्ये ठेकेदारावर पहिला गुन्हा : अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील सुरू असलेल्या युटिलिटी कामांतील निष्काळजीपणामुळे एका माजी सैनिकाचा जीव गेल्याच्या प्रकरणात अखेर ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातमाउली चौकातील रस्त्यावरील खड्यात वाहन अडकल्याने झालेल्या अपघातात माजी सैनिक प्रवीण गायकवाड यांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणी सातपूर पोलिसांनी ठाणे येथील ईगल इन्फ्रा इंडिया प्रा. लि. या कंपनीविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बारदान फाटा ते त्र्यंबक रोड व अंबड लिंक रोड या मार्गावर सुरू असलेल्या कामांदरम्यान अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.

मात्र, खोदलेल्या जागांवर कोणतीही पुरेशी सुरक्षाव्यवस्था, बॅरिकेड्स किंवा इशारा फलक नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांकडून सातत्याने करण्यात येत होता. महासभेत वारंवार हा मुद्दा उपस्थित करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गेल्या शनिवारी (दि.६) सातमाउली चौकात रस्त्यावरील खड्यात वाहन अडकल्याने प्रवीण गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाला.

देशसेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या माजी सैनिकाचा खड्यामुळे बळी गेल्याने संतापाची लाट उसळली होती. संबंधित ठेकेदारासह जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, भारती धिवरे आणि संगीता घोटेकर यांनी केली होती. दरम्यान, शुक्रवारी (दि.१२) मयताच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरनार करत आहेत.

या मृत्यूप्रकरणी ठेकेदार जितका जबाबदार आहे, तितकीच जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची आहे. दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- किशोर गायकवाड, मृताचे काका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT