

कणकवली : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते आचरा रोडदरम्यान डॉ. चंद्रकांत राणे यांच्या हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर पडलेला भलामोठा खड्डा अखेर रातोरात बुजवण्यात आला. दैनिक ‘पुढारी’ वृत्तपत्रामध्ये या गंभीर भल्या मोठ्या खड्ड्याच्या समस्येवर प्रकाश टाकत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन व नगराध्यक्षांकडून अवघ्या काही तासांत मंगळवारी रात्री १० वा. नंतर संबंधित यंत्रणेकडून त्या खड्डाबाबत व पाणी लिकेज गळतीची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी दैनिक पुढारी वृत्तपत्राचे विशेष कौतुक केले.
गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. हा रस्ता रहदारीचा व वाहतुकीने गर्दीचा असल्याने या ठिकाणचा तो खड्डा चुकवण्यासाठी वाहन चालक देखील मोठी कसरत करत होते.याशिवाय स्थानिक नागरिकांनी वारंवार दगड, मुरूम टाकून खड्डा बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र याच खड्ड्यामधून नळ योजनेच्या पाईपलाईनमधून सतत होणाऱ्या गळतीमुळे येथे पाणी साचत राहिले आणि रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली.
या प्रकाराची दखल घेत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. यावेळी त्यांनी नगरपंचायतीच्या संबंधित कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत तातडीने पाईपलाईनचे लीकेज दुरुस्त करून रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दैनिक पुढारी मध्ये यासंदर्भातील वृत्त ठळकपणे प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ हालचाली सुरू केल्या.
विशेष म्हणजे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रातोरात संबंधित खड्डा बुजवण्यात आला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत दैनिक पुढारी वृत्तपत्राने सामान्यांच्या समस्येला वाचा फोडल्याची भावना व्यक्त केली.तसेच नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कार्य तत्परतेबद्दल देखील समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आता याच रस्त्यावरील अन्य खड्डे देखील तात्काळ बुजवून हा रस्ता वाहतुकीसाठी सुसज्ज करावा.तसेच रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांकडेही तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक, येथील रहिवासी व जनतेमधून होत आहे.