School Student Pudhari
नाशिक

Nashik Unauthorized Schools List | जिल्ह्यात 16 अनधिकृत शाळा; शिक्षण विभागाकडून अवैध शाळांना नोटीसा

Nashik Unauthorized Schools List | : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू असलेल्या जिल्ह्यातील १६ शाळांना प्राथमिक शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परवानगीशिवाय शाळा चालवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात घालणे आणि पालकांची फसवणूक करणे, असा गंभीर ठपका या शाळांवर ठेवण्यात आला आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीत आठ शाळा अनधिकृत असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांच्या परवान्यांची तपासणी सुरू केली. या मोहिमेत नाशिक, देवळा आणि बागलाणसह इतर तालुक्यांमध्ये मिळून तब्बल १६ शाळा शासनाच्या परवानगीविना बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

शासकीय नियमानुसार इयत्ता १ ली ते ७ वी, ५ वी ते ८ वी आणि ८ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाची मंजुरी अनिवार्य आहे. २०१९ पूर्वी शाळांना स्थानिक शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षण संचालक कार्यालयाकडून मान्यता मिळत होती. मात्र, नव्या नियमांनुसार आता थेट राज्य शासनाकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात प्रस्ताव सादर करावा लागतो.

शासनाकडून रीतसर मंजुरी मिळाल्यानंतरच शिक्षण विभागाला अवगत करून शाळा सुरू करण्याची परवानगी मिळते. जिल्ह्यातील या १६ शाळांनी कोणतीही अधिकृत प्रक्रिया पूर्ण न करताच परस्पर प्रवेशप्रक्रिया राबवून वर्ग सुरू ठेवले आहेत. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कडक पावले उचलत, पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश केवळ शासनमान्य व अधिकृत शाळांमध्येच घ्यावेत, असे स्पष्ट आवाहन केले आहे.

"शासनाच्या परवानगीविना सुरू असलेल्या शाळांना शिक्षण विभागाने नोटीस बजावली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना परवानगी असलेल्या शाळेत स्थानांतरित करून आपल्या पाल्याचे भवितव्य सुरक्षित करावे."
— साईलता सामलेटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (जि. प. नाशिक)

अनधिकृत शाळा

  • बागलाण : ड्रीम्स इंटरनॅशनल स्कूल नामपूर, जिनियस किड्स अकॅडमी नामपूर, मलबेरी बुश इंटरनॅशनल स्कूल नामपूर, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल नामपूर, होरायझन अकॅडमी शेमळी.

  • चांदवड : कांचनसुधा इंटरनॅशनल स्कूल शिगवे.

  • देवळा : एव्हरग्रीन स्कूल ऑफ एक्सलन्स दहिवड, के. बी. इंग्लिश स्कूल खारीपाडा, अभिनव बालविकास मंदिर.

  • नाशिक : अभिनव बालविकास मंदिर मातोरी, चैतन्य टेक्नो स्कूल चांदशी.

  • निफाड : डीव्हीपी मंडळ डे केअर सेंटर नांदुर्डी.

  • मालेगाव : मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल टिंगरी, मालेगाव, जि. नाशिक.

  • दिंडोरी : किड्स टाऊन इंग्लिश मीडियम स्कूल वलखेड फाटा दिंडोरी, बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी (मराठी व इंग्रजी माध्यम).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT