वणी : दिंडोरी तालुक्यासह वणी, सुरगाणा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात शनिवारी मध्यरात्री आणि त्यानंतर रविवारी पहाटे सलग दोनदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अचानक जमिनीला कंप जाणवल्याने अनेक नागरिक घराबाहेर आले. काही ठिकाणी घरातील पंखे, भांडी व इतर वस्तू हलल्याचे नागरिकांनी सांगितले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, पहिला भूकंप शनिवारी (दि. २५) रात्री ११.५५ वाजून ५० सेकंदांनी झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदविण्यात आली असून भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकच्या वायव्य दिशेला, सुरगाणा–दिंडोरी परिसराच्या दिशेने असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानंतर रविवारी (दि. २६) पहाटे २.४४ वाजता पुन्हा भूकंपाची नोंद झाली. प्राथमिक भूकंप अहवालानुसार या धक्क्याची तीव्रता ३.५ (Mg) इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिक वेधशाळेपासून सुमारे ४९ किलोमीटर अंतरावर नोंदविण्यात आला.
सलग दोनदा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावरही भूकंपाच्या धक्क्यांबाबत संदेशांचा ओघ सुरू झाला.दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली नव्हती. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, तसेच पुढील अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.