नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक कार्यक्षम आणि सुसूत्र बनवण्यासाठी महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून द्वारकासह २८ महत्त्वाच्या चौकांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीच्या वतीने निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार असून, ही यंत्रणा सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
शहरातील वाहतूक कोंडी गंभीर बनली असून, द्वारका व मुंबई नाका येथील कोंडीने विधीमंडळाचे लक्ष वेधले आहे. पार्किंग सुविधांचा अभाव आणि बाजारपेठांतील अव्यवस्थित वाहनतळामुळे कोंडीची समस्या अधिक वाढली आहे. याप्रश्नी आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मनिषा खत्री यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शहरात ३५ ठिकाणी पार्किंग झोन तयार केले जात आहेत. त्याचबरोबर द्वारका, मुंबई नाका, आडगाव नाका, गंगापूर रोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड, रविवार कारंजा, निमाणी, आदी महत्वपूर्ण चौकांमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल यंत्रणेचे अद्ययावतीकरण करण्याचे प्रयत्न आहेत. द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वाहतूक कक्ष मार्फत या ठिकाणी एआय बेस सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पाठोपाठ शहरात जास्त वर्दळ असणाऱ्या २८ ठिकाणी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून एआय आधारीत सिग्नल यंत्रणा बसविली जाणार आहे.
राज्यात सध्या नागपूर शहरात एआय आधारीत सिग्नल यंत्रणेची प्रायोगिक तत्वावर चाचपणी सुरू आहे. त्यानंतर नाशिकच्या द्वारका सर्कल येथे चाचपणी केली जाणार आहे. पाठोपाठ संपूर्ण शहरात टप्प्या टप्प्याने एआय बेस सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
एआय आधारित सिग्नल यंत्रणेमुळे ज्या मार्गिकेवर गर्दी जास्त आहे, तेथील वाहतूक सिग्नलला जास्त वेळ दिला जातो, तसेच जिथे गर्दी कमी आहे, त्या मार्गिकेला कमी वेळ दिला जातो. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून वाहतुकीचे नियमन करणे सोपे होते.
शहरातील महत्वाच्या २८ चौकांमध्ये एआय आधारीत सिग्नल यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जुलै अखेरीस निविदा प्रसिध्द होऊन पुढील तीन महिन्यांत एआय सिग्नल बसविले जातील.सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी, नाशिक.
पारिजात नगर चौक, बी. डी. कामगार चौक, अमृतधाम, यात्रा हॉटेल जवळ, शारदा सर्कल, मॅरेथॉन चौक, केटीएचएम कॉलेज जवळ, सिद्धिविनायक चौक, संभाजीनगर रोड, डी. के. नगर, निर्मला कॉन्व्हेंट स्कूल, मायको सर्कल, भोसला टी पॉइंट, भोसला शाळेजवळ, मॅरेथॉन चौक, राणे नगर सिडको, पवननगर सिडको, मॉडेल चौक, कॉलेज रोड, सातपूर सर्कल, त्र्यंबक रोड, दत्त चौक, लेखानगर बोगदा, काठे गल्ली सिग्नल, सम्राट सिग्नल, आंबेडकर नगर, वडाळा टी पॉइंट, एचडीएफसी चौक, तिबेटियन मार्केटजवळ, माऊली लॉन्स, श्री राम सर्कल, सातपूर कॉलनी, कार्बन नाका, सातपूर एमआयडीसी, एक्स्लो पॉइंट अंबड, गरवारे पॉइंट अंबड, पाथर्डी फाटा (जुना सिग्नल), दत्त मंदिर, अंबड लिंक रोड, मालेगाव स्टँड, पंचवटी आदी.