नाशिक

Nashik Drugs Case : शिंदे गावातील ‘त्या’ गोदामात गुजरातचा कच्चा माल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिंदे गावात शहर पोलिसांनी शोधलेल्या गोदामात कोट्यवधी रुपयांचे एमडी व एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. संशयितांनी कच्चा माल हा गुजरात राज्यातून आणल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी एमडी प्रकरणात अटकेत असलेल्या भूषण पानपाटील व अभिषेक बलकवडे यांची पोलिस कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने दोघांनाही बुधवारपर्यंत (दि.१३) पोलिस कोठडी सुनावली. तर या गुन्ह्यात आधी अटक असलेल्या शिवाजी शिंदे याच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत (दि.९) वाढ केली. (Nashik Drugs Case)

ऑक्टोबर महिन्यात शहर पोलिसांनी शिंदे गावात कारवाई करीत 'एमडी'चे गोदाम उघडकीस आणले होते. त्यातून 'एमडी'सह कच्चा माल जप्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीस शिवा शिंदे यास अटक केली. त्याच्या चौकशीतून तो मुंबईतून काही कच्चा माल आणून एमडी तयार करत असल्याचे उघड झाले. तर या गुन्ह्यातील संशयित भूषण व अभिषेक यांनाही पुणे पोलिसांकडून ताब्यात घेत शहर पोलिसांनी अटक केली. शिंदेची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शिंदेसह तिघांनाही बुधवारी (दि.६) न्यायालयात हजर केले. शिंदेचे वकीलपत्र कोणी न घेतल्याने त्यास विधी सेवा प्राधिकरणतर्फे वकील देण्यात आले. न्यायालयाने शिंदेच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. तर भूषण आणि अभिषेकला आठवडाभर पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nashik Drugs Case)

व्याप्ती वाढती

शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार एमडी प्रकरणात भिवंडीसह गुजरात राज्यातून कच्चा माल आणल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढत आहे. तसेच हे गोदाम भूषण पानपाटील स्वत: सांभाळत होता की, ललित पानपाटीलच्या सांगण्यावरून त्याने कंपनी व गोदाम सुरू केले याचाही शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT