नाशिक : जिल्ह्यातील यापूर्वीच १० तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले असताना, आता त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड या आणखी तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या तीव्रतेची प्रत्यक्ष पडताळणी (ग्राउंड टूथिंग) होणार आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी तालुक्यांचा समोवश या पडताळणीसाठी निवडलेल्या १८ तालुक्यांत नसल्याने, या भागांतील परिस्थितीचा पुन्हा फेरआढावा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे अधिक अचूक मूल्यमापन करण्यासाठी राज्यातील आणखी १८ तालुक्यांत प्रत्यक्ष पडताळणी करण्यास मान्यता दिली आहे. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांचा विचार करत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मदत व पुनर्वसन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. यापूर्वी शासनाने २५ सप्टेंबरच्या निर्णयानुसार २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ निकषांनुसार दुष्काळ जाहीर करीत १२ उपाययोजना व सवलती लागू केल्या आहेत.
यात जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, कळवण, सटाणा, देवळा, पेठ, सुरगाणा या १० तालुक्यांचा समावेश आहे. आता त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड या तालुक्यांमध्ये पडताळणी होणार असल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या मूल्यमापनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विस्तार आणि पावसातील तूट लक्षात घेता, नाशिक व दिंडोरी तालुक्यांचाही फेरआढावा घेतला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे. या दोन्ही तालुक्यांचा समोवश नव्या ग्राऊंड टूथिंग प्रक्रियेत करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या समावेशाबाबत शासनस्तरावर पुढील निर्णय होतो का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण
मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट आणि अन्य घटकांच्या आधारे ही पडताळणी केली जाईल. निवडलेल्या तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्यात येईल. यात उपग्रह छायाचित्रे, नकाशे आणि संगणकीय माहितीच्या आधारे निष्कर्षांची प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे पडताळणी केली जाणार आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहितांमधील तरतुदींनुसार होणाऱ्या या प्रक्रियेत तांत्रिक माहिती आणि शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची सांगड घातली जाणार आहे. त्यामुळे पिकांची स्थिती, पर्जन्याची तूट आणि दुष्काळाची तीव्रतेचे अचूक मूल्यमापन करता येणार आहे. या पडताळणीनंतर उपलब्ध माहितीच्या आधारे शासनास उपाययोजना आणि मदतीबाबत निर्णय घेणे शक्य होणार आहे.
या पडताळणीमुळे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे स्पष्ट चित्र समोर येण्याची अपेक्षा आहे. मात्र, ग्राउंड टूथिंगनंतरच संबंधित तालुक्यांच्या दुष्काळी तीव्रतेबाबत पुढील निर्णय होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.