sweets  
नाशिक

Nashik Diwali gifts shift from sweets to dry fruits-दिवाळीच्या गिफ्टमधून मिठाई गायब

'एफडीए'च्या कारवायांचा धसका : सुकामेवा, चॉकलेट, आकर्षक वस्तूंना पसंती

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

की, दिवाळी म्हटली नातेवाइकांना, मित्रपरिवाराला, व्यावसायिक भागीदारांना आणि आप्तस्वकियांना मिठाईचे आकर्षक डबे भेट देण्याची परंपरा आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत या परंपरेला काही प्रमाणात छेद बसल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात मिठाई उत्पादक, विक्रेते आणि अन्न आस्थापनांविरोधात केलेल्या धडक कारवायांमुळे विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.

परिणामी, यंदा दिवाळीच्या भेटवस्तूंच्या संचातून मिठाई जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र असून, त्याऐवजी सुकामेवा, चॉकलेट, बिस्किटे तसेच विविध आकर्षक वस्तूंचा समावेश असलेल्या भेटवस्तूंना पसंती दिली जात आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागात विशेष तपासणी मोहीम राबविली. दि. १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत तब्बल १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच तीन कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा दोन लाख २७ हजार किलो वजनाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवरही या मोहिमेंतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. काही मिठाई उत्पादकांचे परवाने निलंबित करण्यात आल्याने बाजारपेठेत त्याचे पडसाद उमटले आहेत.

यंदा मिठाईच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांमध्येही जागरूकता वाढली आहे. भेसळ, निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, मुदत संपलेला कच्चा माल आणि अस्वच्छतेच्या मुद्द्यांवरून प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता, विक्रेत्यांनी मिठाईचे डबे भेटवस्तूंमध्ये देणे टाळण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मोठ्या कंपन्या, व्यावसायिक संस्था आणि कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी भेटवस्तूंमध्ये मिठाईऐवजी सुकामेवा, चॉकलेट, फराळाचे पदार्थ आणि आकर्षक उपयोगी वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी दिवाळीच्या काळात काजू कतली, पेढे, बर्फी, लाडू, मोतीचूर आणि विविध प्रकारच्या मिठाईचे डबे भेट देण्याची मोठी परंपरा होती.

मिठाईच्या दुकानांमध्ये यासाठी खास आकर्षक सजावट आणि भेटवस्तूंचे संच तयार केले जात होते. मात्र, यंदा मिठाईच्या डब्यांबरोबरच सुकामेव्याचे आकर्षक संच, चॉकलेट बॉक्स, कुकीज, चहा-कॉफीचे संच आणि विविध गृहोपयोगी वस्तूंची मागणी वाढल्याचे चित्र आहे.

स्वच्छता अन् गुणवत्तेबाबत खबरदारी

एफडीएच्या कारवायांमुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत अधिक खबरदारी घेण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाची तपासणी मोहीम महत्त्वाची असली, तरी मिठाई व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत भेटवस्तूंच्या परंपरेत मिठाईची जागा सुकामेवा आणि विविध वस्तूंनी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT