Mapping Nashik Flood 
नाशिक

Mapping Nashik Flood | "नाशिकच्या आपत्ती व्यवस्थापनाला हायटेक जोड! जिल्ह्यातील 'या' 52 धोकादायक ठिकाणांचे झाले डिजिटल मॅपिंग"

Mapping Nashik Flood | जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ५२ महत्त्वाच्या आणि धोकादायक ठिकाणांचे डिजिटल मॅपिंग पूर्ण झाले असून, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात या उपक्रमाची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ५२ महत्त्वाच्या आणि धोकादायक ठिकाणांचे डिजिटल मॅपिंग पूर्ण झाले असून, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात या उपक्रमाची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली.

जिल्ह्यात १ जुलैपासून सक्रिय झालेल्या मान्सून काळात वाढत्या पूरस्थिती, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या या डिजिटल मॅपिंगमध्ये महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉररूम यांसह महत्त्वाच्या यंत्रणांच्या माहितीआधारे गुगल अर्थ प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या नकाशाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित विभागांपर्यंत जलद पोहोचणे, समन्वय साधणे आणि तातडीने प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.

शहरात पंचवटी, मुंबई नाका, सातपूर एमआयडीसी, इंदिरानगर, गंगापूर रोड, सीसीएम सिग्नल, राजीव गांधी भवन परिसर, पिंपळगाव बहुला, वडाळा नाका आदी भागांत घरांमध्ये पाणी शिरणे, रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे, संरक्षक भिंती कोसळणे, रस्ते खचणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या.

नदीला आलेल्या पुरामुळे काही मार्गांवरील वाहतूक वळवावी लागली, तर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने सखल भाग जलमय झाले होते. ग्रामीण भागात सुरगाणा, देवळा, कळवण आणि इगतपुरी तालुक्यांतील घाटरस्ते दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे तात्पुरते बंद ठेवले.

सापुतारा - वणी राष्ट्रीय महामार्ग, भावडबारी घाट, सप्तशृंग घाट तसेच वासाळी - टाकेद मार्गावरील वाहतुकीवर निर्बंध घातले होते. डिजिटल मॅपिंगमुळे नियंत्रण कक्ष, बचाव पथके आणि संबंधित विभागांना घटनास्थळी तातडीने पोहोचणे, संसाधनांचे नियोजन करणे आणि नागरिकांना जलद मदत पुरविणे अधिक परिणामकारक होणार आहे. मान्सून काळात पूर, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हा तांत्रिक उपक्रम प्रशासनासाठी महत्त्वाचे साधन ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले

52 ठिकाणांचे डिजिटल मॅपिंग

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. सलग अतिवृष्टीमुळे एकूण ९९ घरे अंशत: किंवा पूर्णपणे कोसळली, तर १२ विहिरींचे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे त्र्यंबकेश्वरमधील २९८ आणि इगतपुरीतील ३९ अशा एकूण ३३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती निवारण कक्षाने गंभीर दखल घेत डिजिटल मॅपिंगद्वारे संबंधित ठिकाणे चिन्हांकित केली आहेत. तसेच संबंधित ठिकाणांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

या डिजिटल मॅपिंगमध्ये महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉररूम यांसह महत्त्वाच्या यंत्रणांच्या माहितीच्या आधारे गुगल अर्थ प्लॅटफॉर्मवर नकाशा तयार केला आहे. या आधारे संबंधित ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासह, आपत्कालीन परिस्थितीत संबंधित विभागांपर्यंत जलद पोहोचणे, समन्वय साधणे आणि तातडीने प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT