Vasai Virar Flood: वसई- विरारमध्ये पूरस्थिती गंभीर; 3 दिवसांपासून वीज आणि मोबाईल नेटवर्क बंद, नागरिकांचे हाल सुरूच

Vasai Virar Flood: मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरात पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक भागांत तीन दिवसांपासून वीज आणि मोबाईल नेटवर्क बंद आहे.
Vasai Virar Flood
Vasai Virar FloodPudhari
Published on
Updated on

Vasai Virar Flood: गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भाग अजूनही पाण्याखाली असून काही ठिकाणी सलग तीन दिवसांपासून वीजपुरवठा बंद आहे. वीज आणि मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे.

वीज नसल्यामुळे अनेक घरांमधील पिण्याच्या पाण्याचा साठा संपला आहे. काही भागांत नागरिकांना पावसाचे पाणी साठवून वापरण्याची वेळ आली आहे. अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून अनेक कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, या आपत्कालीन परिस्थितीचा काही ठिकाणी गैरफायदा घेतला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवण्यात आल्याचा तसेच रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मोबाईल नेटवर्क अनेक भागांत पूर्णपणे बंद पडल्याने नागरिकांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. अनेकांना कामाच्या ठिकाणी जाता येत नसल्याने रोजगाराचीही चिंता निर्माण झाली आहे. नागरिकांनी प्रशासन आणि राज्य सरकारने तातडीने वीजपुरवठा, दूरसंचार सेवा आणि अत्यावश्यक सुविधांची व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.

पूरामुळे वसई आणि विरारमधील वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने रिक्षा, एसटी आणि स्थानिक परिवहन सेवा ठप्प झाली आहे. काही भागांत गंभीर रुग्णांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने स्वयंसेवी संस्थांनी ट्रॅक्टरच्या मदतीने रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयात हलवले.

Vasai Virar Flood
E25 Petrol in India: E20 पेट्रोल विसरा, सरकार E25, E30 आणि E85 इंधन आणत आहे, काय आहे प्लॅन?

दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बचावकार्यात गुंतली असून राजावली, भोयदापाडा, कामण, चिंचोटी, वाघराळपाडा, मधुबन, विरार आणि इतर पूरग्रस्त भागांतून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पूरग्रस्त भागांमध्ये वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि संपर्क व्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news